माढ्यातील ६६६ पूरग्रस्त शेतकऱ्यांना ४ कोटी ५३ लाख कर्जमाफी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:26+5:302020-12-05T04:42:26+5:30
मोडनिंब : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे भीमा नदीला पूर आला. या पूरस्थितीत शेती ...
मोडनिंब : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे भीमा नदीला पूर आला. या पूरस्थितीत शेती पिकांचे नुकसान झाले. नुकसानीसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती. माढा तालुक्यातील ६६६ शेतकरी या कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. ४ कोटी ५३ लाख कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
मागील वर्षी जुलै व ऑगस्टमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ४३ गावांना या पुराचा फटका बसला होता. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आ. बबनराव शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. बाधित शेतकऱ्यांना आघाडी सरकारने संबंधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी योजना जाहीर केली होती. येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.
माढा तालुक्यातील १२ गावातील १८२ पूरग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटी १६ लाख २० हजार ४३ रुपये कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. त्यामध्ये बेंबळे, मिटकलवाडी, रुई, आलेगाव (बु), रांझणी, वडोली, चांदज, आलेगाव (खु), टाकळी (टें), माळेगाव, शेवरे, गारअकोले तसेच पंढरपूर तालुक्यातील २२ गावातील ३०६ पूरग्रस्त शेतकऱ्यांना २ कोटी १६ लाख २४ हजार ७१४ इतकी कर्जमाफी मिळाली आहे. त्यामध्ये अजनसोंड, देगाव, शेगावदुमाला, सुस्ते, सांगवी, खेडभोसे, भोसे (तरटगाव), पेहे, उंबरे (पागे), करोळे, कान्हापुरी, पिराची कुरोली, वाडीकुरोली, चिंचोली (भो), गुरसाळे, भटुंबरे, बादलकोट, ईश्वरवठार, व्होळे, नांदोरे, देवडे, पट.कुरोली व माळशिरस तालुक्यातील ९ गावातील १७८ पूरग्रस्त शेतकऱ्यांना १ कोटी २० लाख ७९ हजार इतकी कर्जमाफी मिळाली असून त्यामध्ये लवंग, वाघोली, मिरे, नेवरे, उंबरे (वे), महाळुंग, जांभूड, वाफेगाव, खळवे या गावांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे.
----
फेब्रुवारी, २०२० मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करून मदत देण्याची मागणी शासनाकडे केलेली होती. बाधित शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. माढा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी १५ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
आ. बबनदादा शिंदे