मोठी बातमी: पौष्टिक तृणधान्य उत्पादनासाठी अडीचशे लोकांना दिले साडेसात कोटी
By Appasaheb.patil | Published: March 24, 2023 02:18 PM2023-03-24T14:18:33+5:302023-03-24T14:18:56+5:30
ही कृषि विभागाची महत्वाकांक्षी योजना आहे.
सोलापूर : आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासन सहाय्यत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही कृषि विभागाची महत्वाकांक्षी योजना आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहे. यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत सोलापूर जिल्ह्याचा पौष्टिक तृणधान्य उत्पादनांसाठी समावेश आहे. २५० प्रस्ताव बँकेने मंजूर केली असून ७ कोटी ३७ लाख ३० हजार रूपयांचे वितरण बँकेने केले आहे.
या योजनेतून गत आर्थिक वर्षात १ हजार ८५३ प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले. पैकी १ हजार २५ प्रस्ताव सादर करण्यात आले. जिल्हा संसाधन व्यक्तिकडून १ हजार १४ प्रस्तावांवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली. जिल्हास्तरीय समितीकडून त्यापैकी ९३५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले व सर्व बँकेकडे कर्जमंजुरीसाठी सादर करण्यात आले. त्यापैकी २५० प्रस्ताव बँकेकडून मंजूर व ३३२ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. मंजूर प्रस्तावासाठी बँकेकडून रक्कम रूपये ७ कोटी ३७ लाख ३० हजार रूपये वितरीत करण्यात आले.
सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरु करणे, हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा हेतू आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा या योजनेत समावेश असून, सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत लाभ देण्यात येतो. यामध्ये प्रगतशील शेतकरी, नव उद्योजक, बेरोजगार युवक, महिला, वैयक्तिक मालकी/ भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, गैर सरकारी संस्था, सहकारी संस्था, खाजगी कंपनी इत्यादी. वैयक्तिक लाभार्थी आहेत. तर शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्था या गट लाभार्थी आहेत.