संचारबंदीत ७० ते ८० जण घेतात मोफत शिवभोजनाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:27+5:302021-04-22T04:22:27+5:30
आ. शहाजीबापू पाटील यांनी मंगळवारी सांगोला शहरात अंबिका महिला बचत गटातर्फे चालविल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रास भेट देऊन माहिती ...
आ. शहाजीबापू पाटील यांनी मंगळवारी सांगोला शहरात अंबिका महिला बचत गटातर्फे चालविल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रास भेट देऊन माहिती घेतली. त्यांच्यासमवेत तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळता सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरिबांना एकवेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. ही गरज ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू लोकांना मोफत शिवभोजन थाळी वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार सांगोला शहरातील अंबिका महिला बचत गटामार्फत दररोज दु. १२ ते ३ या वेळेत मोफत शिवभोजन थाळी वाटप करुन गोरगरिबांची भूक भागविली जात आहे.
गतवर्षापासून हजारो लाभार्थ्यांनी या शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतल्याचे बचत गटाच्या अध्यक्षा हिरकण पाटील यांनी सांगितले. यावेळी सचिव सुमन राजमाने व सहसचिव दीपाली पाटील उपस्थित होत्या.