शेळीच्या नावाखाली ७० लोकांचा ‘बकरा’; सव्वातीन कोटींची केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:48 PM2020-09-11T12:48:46+5:302020-09-11T12:52:00+5:30
सोलापुरातील घटना; प्रकल्प गुंडाळून डायरेक्टर सोलापुरातून पळून गेला
सोलापूर : शेळीपालन व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून सोलापुरातील सत्तर लोकांकडून तीन कोटी २३ लाख पाच हजार ५०० रुपयाला फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणुकीवर प्रतिमहिना तीन ते चार टक्के व्याज देत होता; मात्र प्रकल्प गुंडाळून डायरेक्टर सोलापुरातून पळून गेला.
अकिबखान हारुनखान पठाण (रा.श्रीशैल मल्लिकार्जुन नगर, होटगी रोड) व अलीनवाज इमामहुसेन सय्यद (रा. अंबिकानगर, नई जिंदगी, मजरेवाडी) या दोघांनी अलहिलाल बिझनेस कन्सेप्ट प्रा. लि. नावाने सोरेगाव येथे गोट फार्म काढले होते. याचे आॅफिस विजापूर रोडवरील वॉटरफ्रंट बिल्डिंगमधील गाळा नंबर १२ मध्ये थाटले होते. गुंतवणुकीवर प्रतिमहिना दोन ते तीन टक्के व्याज देण्याचे आश्वासन दोघे देत होते. यावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातील काही शेतकरी तर बहुतांश शहरी भागातील लोकांनी पाच लाख, दहा लाख, पंधरा लाख रुपये अशा पद्धतीने गुंतवणूक केली होती. २०१७ मध्ये स्थापन केलेल्या फार्मच्या नावाने दोघांनी लोकांकडून पैसे घेतले. दोघांनी काही दिवस गुंतवणूकदारांना नियमित व्याज दिले; मात्र नंतर त्यांनी व्याज देणे बंद केले. गुंतवणूकदारांचा पैशासाठी तगादा सुरू झाल्यानंतर दोघांनीही वॉटर फ्रंट येथील आॅफिस बंद केले.
आॅफिस बंद झाल्यामुळे आपली फसवणूक झाली असे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. सरफराज अमीर शेख (वय ४३, रा. आदर्श नगर, लक्ष्मीनारायण टॉकीजच्या पाठीमागे) यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
गोट फार्म होते दुसºयाचे
अकिबखान हारुनखान पठाण (रा.श्रीशैल मल्लिकार्जुन नगर, होटगी रोड) व अलीनवाज इमामहुसेन सय्यद (रा. अंबिकानगर, नई जिंदगी, मजरेवाडी) या दोघांनी सोरेगाव येथील गोट फार्म दाखवून कंपनीचा हा व्यवसाय असल्याचे गुंतवणूकदारांना सांगत होते.