करमाळा तालुक्यात शेतीपंपाची ७०० कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:09+5:302021-06-21T04:16:09+5:30
करमाळा : तालुक्यातील ३६ हजार ३६७ पंपधारकांनी शेतीपंपाची जवळपास ७०० कोटी रुपयांची थकबाकी थकवली आहे. वीज वितरण कंपनीकडून थकबाकी ...
करमाळा : तालुक्यातील ३६ हजार ३६७ पंपधारकांनी शेतीपंपाची जवळपास ७०० कोटी रुपयांची थकबाकी थकवली आहे. वीज वितरण कंपनीकडून थकबाकी वसुली करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, वीज वितरण कंपनीला कटू कारवाई करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी चालू वीज बिल तत्काळ भरून सहकार्य करावे, असे आवाहन उपअभियंता सुमित जाधव व अतुल गलांडे यांनी केले आहे. करमाळा उपविभागात १८ हजार २६४ ग्राहक असून, जेऊर उपविभागात १८ हजार ८३ ग्राहक आहेत. या सर्व ३६ हजार ३६७ वीज पंपधारकांकडे ही थकबाकी आहे. शेतक-यांनी तत्काळ किमान चालू बाकी भरण्याचे आवाहन केले आहे. या थकाबाकीपोटी वसुली मोहीम राबविली जाणार असल्याचे वीज कार्यालयाकडून सांगण्यात आले.
---
ज्या शेतकऱ्याकडे गेल्या अनेक वर्षांपासूनचे शेतीपंपाचे बिल आहे, अशा शेतकऱ्यांचे २०१५ पूर्वीचे व्याज व विलंब आकार माफ करण्यात आलेला आहे. त्यामुळे ६० टक्के बिलात सूट मिळत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- सुमित जाधव
उपअभियंता वीज वितरण कंपनी.