उसाप्रमाणेच दूध दरासाठीही ७०:३० चा फॉर्म्युला, हिवाळी अधिवेशनात कायदा करणार, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:01 AM2017-11-03T11:01:58+5:302017-11-03T11:06:33+5:30
खासगी दूध संघावर कसलेही नियंत्रण नसल्याने दुधाचे दर त्यांच्या सोईने दिले जात असल्याचे आम्हाला दिसत असल्यानेच उसाच्या दरासाठी असलेला ७०:३० चा फॉर्म्युला दुधालाही लागू करण्यात येणार असून त्यासाठीचा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला जाणार असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अरूण बारसकर
सोलापूर दि ३ : खासगी दूध संघावर कसलेही नियंत्रण नसल्याने दुधाचे दर त्यांच्या सोईने दिले जात असल्याचे आम्हाला दिसत असल्यानेच उसाच्या दरासाठी असलेला ७०:३० चा फॉर्म्युला दुधालाही लागू करण्यात येणार असून त्यासाठीचा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला जाणार असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राज्यात शासन अखत्यारित महानंदसह खासगी दूध संघांनी गाईच्या दूध खरेदीचा दर प्रति लिटर २१ रुपये केला आहे. शेतकºयांना परवडत नसले तरीही दूध विकण्याशिवाय पर्याय नाही. शासनाने गाईच्या दुधाला खरेदी दर प्रति लिटर २७ रुपये जाहीर केला असला तरी तो महानंद व खासगी संघ मान्य नाही. या धर्तीवर राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शेतकºयांना परवडेल असे नाही तर फायदा होईल, अशा योजना पुढील वर्षात सुरू करणार असल्याचे सांगितले. देशाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर राज्यात सहकारी संघ अस्तित्वात असताना खासगी दूध संघ तालुक्यातालुक्यात निर्माण झाले. हे खासगी संघ सहकारी संघावर व विधानसभा, विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करणाºयांचेच आहेत. खासगी संघावर राज्य शासनाचा अंकुश राहणार नाही, अशाच पद्धतीने कायदे केल्याने आज आम्ही दुधाला जाहीर केलेला दर देण्याचे खासगी संघ मान्य करीत नाहीत.
उसासाठी एफ.आर.पी. किंवा कारखान्याला मिळणाºया उत्पन्नापैकी ७० टक्के शेतकरी व ३० टक्के कारखाना व्यवस्थान खर्चासाठी असा कायदाच आहे. दुधाबाबत असा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असून कायदा मंजुरीनंतर साखर कारखान्याप्रमाणे सर्वच दूध संघांवरही शासनाचे नियंत्रण येईल, असे जानकर म्हणाले. आज राज्यातील शासकीय दूध डेअºया उद्ध्वस्त झाल्या असून गुजरातमधील अमूल व कर्नाटकमधील नंदिनी डेअरीपेक्षाही पुढे जाण्यासाठीची योजना महाराष्टÑातील दूध उत्पादकांसाठी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------
महिलांच्या नावेच पैसे जमा होतील
- राज्यातील एकूण दुधापैकी २३ टक्के दूध सहकार संघाकडे जमा होते.
- नवा कायदा मंजुरीनंतर संपूर्ण शेतकºयांची भावना सहकारी संघाला दूध घालण्याची होईल.
- राज्यात १५ ठिकाणी पशुखाद्य कारखाने सुरू करणार असून आजच्या दराच्या २५ टक्के दरात शेतकºयांना पशुखाद्य मिळेल.
- आरे शक्ती ब्रँड विकसित करून शेतकºयांसाठी महापूर योजना राबविणार असून अन्य राज्यांच्या धर्तीवर थेट शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होतील.
- या सर्व योजना राबवित असताना महिलांच्या नावावर बँकांत खाते उघडून महिलांच्या नावेच सर्व योजनांचे पैसे जमा करणार.