७/१२ कोरा झाल्याने, बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना!
By संताजी शिंदे | Published: April 12, 2023 04:54 PM2023-04-12T16:54:39+5:302023-04-12T16:55:45+5:30
मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती.
साेलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील जमिनींवर लावण्यात आलेले 'एमआयडीसी' हे नाव काढण्यात आले, त्यामुळे तब्बल २०५ दिवसाच्या आंदोलनानंतर बैलगाड्या पुन्हा मंद्रुपच्या दिशेने रवाना झाल्या. १४९ शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे झाल्यामुळे, आंदोलन मागे घेण्यात आले.
मंद्रुप येथे औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्यासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार होती. संपादनाची प्रक्रीया करण्यासाठी शासनाने सर्व जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर 'एमआयडीसी' असे नाव लावण्यात आले होते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करता येत नव्हती. आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, आमच्या ७/१२ वरील 'एमआयडीसी' हे नाव काढण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. २० सप्टेंबर २०२२ रोजी मंद्रुप येथील ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरूवात केली होती, मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी १ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले, मात्र काही परिणाम झाला नाही. शेतकऱ्यांनी ९ मार्च रोजी मंद्रुप-मुंबई असा बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. अखेर १४ मार्च रोजी मंद्रुप-मुंबई बैलगाडी मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा विजापूर रोडवरील एजी पाटील कॉलेज जवळ मुक्कासाठी थांबला असता, त्यांना मुंबईला न जाण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मुंबईला जात आहे, तुमची मागणी मान्य होईल असे अश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी दक्षिण पंचायत समिती कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली होती.