मुलाच्या त्रासाला कंटाळून ७२ वर्षीय पित्याने संपवलं जीवन, चिठ्ठी लिहून घेतला गळफास
By रूपेश हेळवे | Updated: January 30, 2024 16:43 IST2024-01-30T16:42:23+5:302024-01-30T16:43:00+5:30
या प्रकरणी मुलगा राजाराम अर्जुन गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला

मुलाच्या त्रासाला कंटाळून ७२ वर्षीय पित्याने संपवलं जीवन, चिठ्ठी लिहून घेतला गळफास
रुपेश हेळवे, सोलापूर: मुलाच्या त्रासाला कंटाळून ७२ वर्षीय पित्याने चिठ्ठी लिहून दोरीच्या साहाय्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (मल्लेवाडी, ता. मंगळवेढा) येथे घडली असून याप्रकरणी मुलगा राजाराम अर्जुन गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत अर्जुन शहाजी गायकवाड (वय ७२, रा. मल्लेवाडी) यांना त्यांचा मुलगा तथा आरोपी राजाराम अर्जुन गायकवाड हा दारूच्या नशेत घरी येऊन विनाकारण शिवीगाळ करीत. वडिलांच्या गच्चीला धरून गळा आवळण्याचा प्रयत्न करीत असे. या त्रासाला कंटाळून दि. २९ रोजी सकाळी ११:३० वाजता मल्लेवाडी येथील दौलतसिंग रजपूत यांच्या शेतातील झाडास दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
दरम्यान, मयताच्या खिशात एक लिखीत चिठ्ठी सापडली असून मुलगा राजाराम हा गेली पंधरा दिवसापासून फार त्रास करीत आहे, दोन दिवसांपूर्वी माझा गळा दाबून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्याच्या धमकीला घाबरून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आले होते. याची फिर्याद मुलगा जयंत अर्जुन गायकवाड याने पोलिसात दिल्यानंतर भा.दं.वि. कलम ३०६ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.