४२ गावांतील ७४४ जणांना निवडणूक लढविण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:45+5:302020-12-29T04:21:45+5:30
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) अन्वये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्र दाखल केलेले तसेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी ...
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) अन्वये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्र दाखल केलेले तसेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक निकाल जाहीर केलेल्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत निवडणूक खर्च विहित वेळेत व विहित रीतीने संबंधित निवडणूक अधिकारी अथवा सक्षम अधिकाऱ्याकडे सादर न केल्यास त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असताना राज्य निवडणूक आयोगाने २०१५ साली ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या निवडणूक खर्चाचा हिशोब ४२ गावांतील ७४४ उमेदवारांनी निवडणूक आयोगास वेळेत सादर केला नाही. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी सादर केली होती. यावर निवडणूक आयोगाने कारवाईचा निर्णय घेत त्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे.
अपात्र ठरलेले सदस्य
सांगोला तालुक्यातील खिलारवाडी १०, कमलापूर १६, शिरभावी २, अचकदाणी २६, भोपसेवाडी २३, बुरंगेवाडी २५, डोंगरगाव १८, धायटी १८, वाटंबरे ७, जुजारपूर २८, जुनोनी ३०, हंगिरगे १५, लोणविरे २२, हणमंतगाव ११, अजनाळे २८, बुद्धेहाळ १२, इटकी १२, मानेगाव ७, वाकी-शिवणे २२, हातीद २८, हटकर-मंगेवाडी ६, जवळा २, कटफळ २१, गौडवाडी ३१, अकोला ४, राजुरी १०, महूद ५६, लक्ष्मीनगर ९, पारे ५, कडलास ४७, लोटेवाडी १८, किडेबिसरी १, कोळा ५६, यलमर-मंगेवाडी १३, आलेगाव ९, अनकढाळ १, हलदहिवडी ६, महिम १७, बामणी १, नाझरे ४, वासूद १, सोमेवाडी १ अशा ४२ गावांतील ७४४ सदस्य चालू ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपात्र ठरले आहेत.