सोलापुरात घडले ७५२ चोरीचे गुन्हे घडले; ४५२ गुन्ह्यांचा छडा, अडीच कोटी मिळवले
By विलास जळकोटकर | Published: January 10, 2024 07:41 PM2024-01-10T19:41:46+5:302024-01-10T19:42:55+5:30
१५ जणांवर एमपीडीए, १० तडीपार
सोलापूर: गेल्या वर्षी शहरामध्ये मालमत्ता चोरीचे ७५२ गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदले गेले. त्यात गुन्हे शाखेने गतवर्षीच्या २७० आणि २०१६ पासूनचे ३९ अशा ३०९ गुन्ह्याचा छडा लावून चोरीला गेलेल्या २ कोटी ६१ लाख ७३ हजार ९५३ मालमत्तेपैकी २ कोटी ४४ लाख ८५ हजार ५६६ एवढी मालमत्ता हस्तगत केली. यात सात ठाण्याकडून १७२ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
मावळत्या २०२३ या वर्षात घरफोड्या, चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, पिक पॉकेटिंग, मोबाईल चोरी अशा विविध मालमत्ताविषयक चोरीचा छडा लावण्यासाठी शहरातील सात पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या पथकाकडून अथक परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले. गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पथकांनी २०१६ ते २३ या आठ वर्षात सातही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नोंदल्या गेलेल्या ३०९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. मालमत्ता जप्तीचे प्रमाण ९३ टक्के आहे.
याशिवाय मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात एकूण १ कोटी ५१ लाख ३५ हजार २ रुपयांची दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. यामुळे सन २०२३ मध्ये सोलापूर शहर गुन्हे शाखेने ३ कोटी ९६ लाख २० हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१५ जणांवर एमपीडीए, १० तडीपार
वर्षभरात ६ फरार आरोपी, ३९ पाहिजे आरोपी पकडले. १३ धोकादायक व २ हातभट्टीवाले अशा १५ जणांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली. १० आरोपींवर महाराष्ट्र कायदा कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली.