माढा तालुक्याची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल, १०८ पैकी ७९ ग्रा़पं हागणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:04 PM2017-10-23T17:04:44+5:302017-10-23T17:07:50+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पंचायत समितीच्या अंतर्गत १०८ ग्रामपंचायतीपैंकी ७९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
लऊळ दि २३ : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पंचायत समितीच्या अंतर्गत १०८ ग्रामपंचायतीपैंकी ७९ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधुन त्याचा नियमित वापर करण्यासाठीचा प्रयत्न या चळवळीतून होत आहे. त्यामध्ये तालुक्यातील उर्वरीत गावांतूनही शौचालय बांधणीला वेग आल्याचे दिसत आहे.यामुळे माढा तालुका सध्या ९१ टक्के हागणदारीमुक्त झाला असुन १०० टक्केकडे वाटचाल करीत असल्याची माहिती गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी दिली़
१०८ ग्रामपंचायतीपैकी ७९ टक्के ग्रामपंचायती सध्या हागणदारीमुक्त झाल्या असून एकुण ४३ हजार १७३ शौचालयापैकी ३८ हजार ९६४ बांधून वापरात आहेत.उर्वरित ग्रामपंचायतीमधील ४हजार २०९ शौंचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर सुतार यांच्या पथकाचे काम प्रगतीपथावर आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तालुक्यातील गावागावात तब्बल ५ कोटी ६८ लाख ८६ हजार ६०० रूपयांचा निधी अनुदानरुपी लाभार्थ्यांसाठी खर्च करण्यात आला आहे.
माढा तालुक्यामध्ये टेंभुर्णी, उपळाई खु, मोडनिंब, कुर्डू, उपळाई बु, रोपळे, कव्हे, बेंबळे, पिंपळनेर, भोसरे अशी काही गावे मोठ्या लोकसंख्येची आहेत. त्यामुळे तालुका हगणदारीमुक्तीच्या १०० टक्के शौचालयाच उद्दिष्ट पूर्तिसाठी जि प चे अध्यक्ष संजय शिंदे, माढ्याचे सभापती विक्रम शिंदे ,स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक ज्ञानेश्वर सुतार व ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी हे वारंवार प्रबोधन करुन आत्तापर्यंत तब्बल ९१ टक्के गावे हगणदारीमुक्त केली आहेत. त्यासाठी स्वच्छता अभियान विभागाचे कामकाज वाढवून लाभार्थ्यांचे शौचालय बांधकामाचे अनुदान काम पूर्ण होताच त्वरित देण्याच्या पद्धतीमुळे व त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे सध्या तालुका हागणदारी मुक्त होण्याच्या शिखरावरती आहे.
तालुक्यातील हागणदारी मुक्ती कडे वाटचाल करणा-या व राहीलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत- मोडनिंब,टेंभूर्णी,कुर्डु,रोपळे( क),मानेगाव,तांदुळवाडी,उपळाई(बु),उपळाई( खु), दारफळ, सुलतापुर, म्हैंसगाव, कव्हे, वाकाव, वडशिंगे, परिते, अकोले( खु),अरण, चांदज,भोगेवाडी,मुंगशी, भुताष्टे, पिंपळनेर,आहेरगाव, बारलोणी, उजनी(मा), बेंबळे, घोटी,व व्होळे (खु),बारलोणी अशी आहेत.