बनावट सोने तारण ठेवूण कॅनरा बॅंकेला ८६ लाखाला फसवले
By संताजी शिंदे | Published: June 14, 2024 08:05 PM2024-06-14T20:05:05+5:302024-06-14T20:05:13+5:30
शुद्दता तपासणाऱ्या कर्मचाऱ्यासह १४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
सोलापूर: बनावट सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र देवून कर्जदारांच्या संगनमताने ८५ लाख ९३ हजार ३०० रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी, शुद्धता तपासणाऱ्या कर्जदारासह १४ जणांविरूद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक १ फेब्रुवारी २०२४ ते २८ मे २०२४ दरम्यान शहरातील कॅनरा बॅंकेच्या चार शाखांमद्ये झाली आहे.
सुनिल नारायण वेदपाठक, जावेद वजीर सय्यद, हुसेन पापा शेख, युवराज शिवराम ढेरे, कार्तिक सारसंभी, जुबेर जहांगीर मुल्ला, भुजंग सुनिल शेळके, जयवंत पुंडलिक ढेकळे, जैनोद्दीन शेख, सोमनाथ मधुकर शेळके, सुरेश बळीराम मुळे, गहिनीनाथ शिंदे, कादीर मलिक पठाण, उत्तरेश्वर मल्लीकार्जून बोबे (सर्व रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सुनिल वेदपाठक हे कॅनरा बॅंकेच्या शहरातील मंगळवार पेठ, मंजरेवाडी, सातरस्ता व चाटी गल्ली येथील शाखेत सोने तारण कर्ज प्रकरणात शुद्धता तपासण्याचे काम करतात. सोन्याची शुद्धता तपासणे, वजन करणे, सोन्याचे मुल्यांकन करून त्याबाबत बॅंकेकडील पासकार्डचा फॉर्म स्वहस्ताक्षरात प्रमाणीत करून प्रमाणपत्र देणे हे त्यांचे काम आहे. या कामासाठी त्यांना बॅंकेने मानधनावर नेमले आहे.
असे असताना त्यांनी सोने तारण कर्ज प्रकरणात १३ जणांनी संगणमत करून दोन हजार २५५ ग्रॅम बनावट सोने तारण ठेवून ८५ लाख ९३ हजार ३०० रूपयाचे कर्ज घेतले. जुबेर मुल्ला दुसऱ्यांदा सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असे फिर्यादीमद्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत कॅनरा बॅंकेचे चिफ मॅनेजर अनिलकुमार बालाजी शहापूरवाड (वय ४४ रा. विजापूर रोड सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.