मोहोळ शौचालय घोटाळ्यात ९ कर्मचारी निलंबित
By Admin | Published: June 4, 2014 12:24 AM2014-06-04T00:24:48+5:302014-06-04T00:24:48+5:30
मास्टर मार्इंड हजरत शेख याचाही समावेश
सोलापूर: मोहोळ शौचालय घोटाळ्याला जबाबदार धरुन घोटाळ्याला मास्टर मार्इंड हजरत शेखसह ९ कर्मचार्यांना जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. अलीकडच्या दोन वर्षातील मोठा घोटाळा जिल्हा परिषद कर्मचार्यांनी केला आहे. निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणार्या अनुदानावर जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांनीच डल्ला मारला आहे. एकाच लाभार्थ्याच्या नावावर अनेक वेळा धनादेश काढून ती रक्कम हडप केली आहे. क्रॉस चेक न काढता बेअरर धनादेश काढणे तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न करता परस्पर रक्कम उचलली आहे. गैरप्रकार करण्यासाठी सहकार्य करणार्या प्रमुखांवर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली असून पोलिसात गुन्हाही दाखल होणार आहे. शौचालय अनुदान हडप करणार्या या प्रकरणाचा मास्टर मार्इंड हजरत इब्राहिम शेख याला निलंबित केले आहे. शेख हा जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक असून स्वच्छतादूत म्हणून काम पाहत होता. तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी (सध्या मोहोळ येथे कार्यरत कृषी अधिकारी) एस. एन. मिरगणे, लेखा विभागाचे सहायक लेखाधिकारी फुलसिंग चव्हाण, कनिष्ठ सहायक जी. आर. कांबळे, विस्तार अधिकारी एच. ए. गायकवाड, स्वाती गायकवाड, समाधान जाधव (ग्रामसेवक वाफळे), नित्यानंद कुलकर्णी (ग्रामसेवक सौंदणे), कनिष्ठ सहायक एम. बी. पठाण यांना निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी बिपीन इंगळे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
-----------------
नियोजन करुनच घोटाळा
नियमाचा कसलाही आधार न घेता सभापती पुत्र समीर गायकवाड याची स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती केली होती. चुकीच्या पद्धतीने नियुक्ती व काही गावात प्रबोधन केल्याचे दाखवून गायकवाड याने मानधन उचलले आहे. एकूणच नियोजन करुन गैरप्रकार केल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.