एकरात घेतले २९ टन फळपीक अन् उत्पन्न मिळवले अडीच लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:16 PM2020-03-27T12:16:30+5:302020-03-27T12:18:45+5:30
विभूते कुटुंबाची यशोगाथा; कोरवलीच्या कलिंगडाची करणी पोहोचली जर्मनीत
नितीन उघडे
कामती : शेतीत पैसे घालणे, मेहनत करणे म्हणजे निसर्गाबरोबर पैज लावण्यासारखेच असते. निसर्गाने साथ दिली तर मालामाल अन् नाही दिली तर कंगाल असा नियम असतो. या नियमाची पैज लावली कोरवली (ता.मोहोळ) येथील शेतकरी लक्ष्मण विभूते यांनी अन् मिळवले एकरी अडीच लाखांचे उत्पन्न. आज या कलिंगडाची करणी जर्मनीत पोहोचली आहे.
ही यशोगाथा आहे लक्ष्मण विभूते यांची़ त्यांची नऊ एकर वडिलोपार्जित शेती कोरवली येथे आहे. लक्ष्मण यांनी इलेक्ट्रीशियन पदवीपर्यंत शिक्षण घेतले़ पण त्यांनी नोकरी केली नाही. वडिलोपार्जित असणारी शेती कसण्यातच त्यांनी आनंद मानला़ या वर्षी नऊ एकर जमिनीपैकी एक एकरात चामुंडा ५५ या वाणाच्या कलिंगडाची लागवड केली.
दोन महिन्यापूर्वी शेतीची मशागत करून एकरी दोन ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर ६ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुण ठिबक सिंचन केले़ त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे ६ हजार रोपांची लागवड केली. ८ ते १० दिवसांच्या अंतराने खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी आणि रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. या एक एकरावर लागवडीसाठी ६० हजार रुपये खर्च केले. दोन महिन्यातच कलिंगड विक्रीसाठी आले. शेतातून मिळालेला सर्व माल दिल्ली येथे पाठवण्यात आला़ पुढे त्या व्यापाºयांनी माल जर्मनीला निर्यात केला.
कलिंगडकडचा कल वाढला
- कमी कालावधीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी शेतकºयांचा प्रयत्न असतो. यातच मागील दोन वर्षांपासून कोरवली परिसरात अनेक शेतकरी कलिंगड लागवड करीत आहेत. या वर्षी मागील तीन महिन्यात कलिंगड लागवड करून पंचक्रोशीतून विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. शेकडो एकर क्षेत्रात कलिंगड पीक पाहायला मिळते आहे़ ५० ते ६० दिवसात येणारे पीक त्यातही हमखास बाजारभाव मिळत असल्याने शेतकºयांचा कलिंगड लागवडीकडे कल वाढलेला दिसतोय़ सध्या स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातून तसेच परदेशातूनही कलिंगडाला मागणी आहे.
वडिलांनी मला इलेक्ट्रीशियन पदवीपर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली. गरीब परिस्थिती असल्याने नोकरीची गरज होती़ पण गावात कलिंगडापासून जास्त उत्पन्न मिळत असल्याचे पाहून शेतीकडे वळलो. आता नोकरीची गरज नाही़ शेती करून आनंदी जीवन जगतो आहे़ प्रयोगशील शेती काळाची गरज आहे़
- लक्ष्मण विभूते
कलिंगड उत्पादक, कोरवली