coronavirus; ११९ वर्षांचे सिव्हिल हॉस्पिटल करतंय कोरोनासाठी व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:23 AM2020-03-19T11:23:17+5:302020-03-19T11:26:48+5:30
कोरोनाशी लढा: साथीच्या उपचारासाठी तयार केलेले हॉस्पीटल, डॉक्टरची टीम म्हणतेय हम है तयार...
राजकुमार सारोळे
सोलापूर : इंग्रजांनी साथीच्या रोगाच्या बंदोबस्तासाठी ११९ वर्षांपूर्वी सोलापुरात तयार केलेले सिव्हिल हॉस्पिटल आजही कोरोना साथीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
इंग्रजांनी साथीच्या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी १८९७ ला महामारी कायदा लागू केला. त्यानंतर दहा वर्षांनी महाराष्ट्रात साथीच्या आजाराच्या बंदोबस्तासाठी पुण्यात ससून, मिरज आणि सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटलचे बांधकाम हाती घेतले. या तिन्ही हॉस्पिटलच्या इमारती दगडी असून, डिझाईन जवळपास एकसारखी आहे.
सोलापुरात सध्या अस्तित्वात असलेले सिव्हिल हॉस्पिटल साथीच्या रोगासाठी असल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची लागण शहरातील नागरिकांना होऊ नये म्हणून हे त्याकाळी शहराबाहेर बांधण्यात आले होते. कालांतराने नागरी वस्ती वाढत जाऊन सिव्हिल हॉस्पिटल सध्या मध्यवर्ती वसल्याचे दिसून येते.
इंग्रजांनी जुन्या बी ब्लॉकमध्ये साथरोग रुग्णालय सुरू केले. या इमारतीचा पायाभरणी समारंभ १२ डिसेंबर १९११ रोजी त्या काळच्या जिल्हाधिकाºयांच्या हस्ते झाला. त्यानंतर या रुग्णालयाचे उद्घाटन व्ही. जॉर्ज यांच्या हस्ते झाले. या रुग्णालयास किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल असे नाव देण्यात आले होते. पहिले सिव्हिल सर्जन म्हणून डॉर्करप यांनी काम पाहिले. हे रुग्णालय सामान्य लोकांच्या सेवेसाठी उपयुक्त ठरल्याने सिव्हिल हॉस्पिटल म्हणून नाव रूढ झाले. ११९ वर्षांच्या काळात या हॉस्पिटलमध्ये अनेक नामवंत डॉक्टरांनी रुग्णसेवा केली.
१९६२ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग वेगळा झाला. महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या देखरेखीखाली रुग्णालयाचा कारभार सुरू झाला. त्यानंतर वेगवेगळे विभाग निर्माण झाले. रुग्णसेवेसाठी ओपीडी, ए व सी ब्लॉकची निर्मिती झाली. त्यानंतर जुन्या बी ब्लॉकमध्ये अस्थी, नेत्र, स्त्रीरोग आणि डिलिव्हरी असे विभाग होते. नवीन बी ब्लॉकच्या निर्मितीनंतर हा ब्लॉक दहा वर्षे धूळखात पडून होता. नुकतेच सामाजिक संस्थेने या इमारतीचे नूतनीकरण करून इतिहास ताजा ठेवला आहे. त्याकाळी बी ब्लॉकला लागूनच साथरोगासाठी छोटी दगडी इमारत बांधलेली आहे. या इमारतीत आजही संसर्गजन्य आजाराचे रुग्ण ठेवले जातात. याठिकाणी स्वॉईन फ्लू, कॉलरा, टीबीच्या रुग्णांवर केले जातात. १९७२ च्या दुष्काळात पसरलेल्या साथीच्या आजारावर या ठिकाणच्या पथकाने रात्रंदिवस काम करून उपचार केले. त्याचबरोबर अलीकडच्या काळात उन्हाळा तीव्र होत आहे.
कोरोनाचा खास कक्ष सुरू
- कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खास कक्ष तयार करण्यात आला आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिसिन विभागाचे डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजेश चौगुले, डॉ. औदुंबर मस्के यांच्याबरोबर मेडिसिन, कम्युनिटी मेडिसिन, मायक्रो बायोलॉजी, सोशल मेडिसिन या विभागातील तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. कोरोनाला घाबरू नका, फक्त खबरदारी घ्या. लक्षणे आढळल्यास जवळच्या दवाखान्यात जा. प्राथमिक अवस्थेत हा आजार बरा होतो. संशयितांवर उपचारासाठी आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया डॉ. धडके यांनी दिली.