२३ गावांत ९१ बोगस डॉक्टर; यामुळे वाढतोय मृत्यूदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:35+5:302021-05-22T04:20:35+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण निघत आहेत. यामुळे प्रशासन चिंतित आहे. ग्रामीण लोक कोरोनाचा आजार ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण निघत आहेत. यामुळे प्रशासन चिंतित आहे. ग्रामीण लोक कोरोनाचा आजार अंगावर काढत असल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासन म्हणत असले तरी, थोडेफार लक्षण जाणवताच ते स्थानिक बोगस डॉक्टरांकडे उपचार घेतात. यात चार ते पाच दिवस जातात. त्यातून रुग्ण बरे झाले तर ठीक, अन्यथा तालुका कोरोना हॉस्पिटल किंवा सोलापूरचा मार्ग दाखवून मोकळे होतात. या सर्व घडामोडीत बराच वेळ निघून गेलेला असतो. तेव्हा रुग्णांची परिस्थिती हाताबाहेर जाते आणि यातूनच रुग्ण दगावण्याची शक्यता वाढलेली असते. यामुळे शहर असो किंवा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांची प्रॅक्टिस बंद ठेवली तर ग्रामीण भागातील सध्याचा ५.२५ टक्के असलेला मृत्युदर कमी होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यात २३ गावांत ९१ बोगस डॉक्टर बिनधास्तपणे प्रॅक्टिस करीत आहेत. यांना कोण रोखणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अशी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर प्रशासनाच्या निदर्शनास येताच यावर तहसीलदार अंजली मरोड यांनी दोन ठिकाणी कारवाई करण्यास भाग पाडले आहे.
----
गावनिहाय बोगस डॉक्टरांची यादी अशी
अक्कलकोट तालुका आरोग्य विभागाकडे जेऊर-१०, करजगी-१, मंगरूळ-३, तडवळ-५, मुंढेवाडी-२, कुमठा-१, सुलेजवळगे-४, नागणसूर-७, हैद्रा-२०, गुरववाडी-१, तोळणूर-४, नाविदगी-१, शावळ-१, हिळळी-१, मराठवाडी-१, कलप्पावाडी-१, शिरवळ-२, बादोला बु-१, सलगर-४, दुधनी-८, मैंदर्गी-११, चपळगाव-११, वागदरी-८ अशा २३ गावांमध्ये ९१ डॉक्टर बोगस पद्धतीने उपचार करीत असल्याची नोंद उपलब्ध आहे. याशिवाय आणखी काही गावांनाही ते विशिष्ट दिवशी भेट देऊन रुग्ण तपासणी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
-------
ग्रामीण भागात बोगस डॉक्टर वाढलेले आहेत हे खरे आहे. यामुळे मागील आठवड्यात दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी पथक नेमून कारवाई करू.
- डॉ. अश्विन करजखेडे, तालुका आरोग्य अधिकारी
----