सोलापूर विद्यापीठ निवडणुकीत ९३ अर्ज मंजूर; चाळीस जणांचे अर्ज बाद
By बाळकृष्ण दोड्डी | Published: September 15, 2022 12:32 PM2022-09-15T12:32:54+5:302022-09-15T12:33:22+5:30
Solapur University : सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटसह विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सर्व प्रवर्गातील एकूण १९३ जागांसाठी ९३ जणांचे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत मंजूर झाले असून तर ४० जणांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.
सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटसह विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्रेणिक शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी छाननीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सिनेटच्या सर्व प्रवर्गातील ३० जागांसाठी १३३ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी ४० जणांचे अर्ज अवैध ठरले असून ९३ जणांचे उमेदवार अर्ज पात्र ठरले आहेत. यामध्ये प्राचार्यांच्या दहा जागांसाठी नऊ अर्ज आले होते, सर्व अर्ज येथे मंजूर झाले आहेत.
संस्थाप्रतिनिधींच्या सहा जागांसाठी एकूण १३ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी तीन अर्ज अवैध ठरले असून दहा अर्ज मंजूर झाले आहेत. शिक्षकांच्या १० जागांसाठी ३० अर्ज आले होते, त्यापैकी २३ अर्ज मंजूर तर ७ अर्ज अपात्र ठरले आहेत. विद्यापीठ शिक्षकांच्या तीन जागांसाठी पाच अर्ज झाले होते, त्यापैकी तीन अर्ज मंजूर तर दोन अर्ज अपात्र ठरले आहेत.