भुयारी मार्ग, रस्ते विकासासाठी ९४ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:21 AM2021-05-10T04:21:37+5:302021-05-10T04:21:37+5:30
पुणे-सोलापूर या ६५ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर आढेगाव व मोहोळ येथील कन्या प्रशालेसमोर अपघातप्रवण क्षेत्र होते. त्या ठिकाणीही रस्ता ओलांडण्यासाठी ...
पुणे-सोलापूर या ६५ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर आढेगाव व मोहोळ येथील कन्या प्रशालेसमोर अपघातप्रवण क्षेत्र होते. त्या ठिकाणीही रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची मागणी होती. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. आढेगाव येथील भुयारी रस्त्यासाठी २३ कोटी ५३ लाखांच्या कामास व मोहोळ येथील भुयारी रस्त्याच्या कामास २० कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे नितीन गडकरी यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
त्याशिवाय पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग टेंभुर्णी शहराला बाह्यवळण देऊन गेला आहे. टेंभुर्णी शहरातून गेलेला ६.२३ किलोमीटरच्या मूळ रस्त्याच्या विकासासाठी निधीची मागणी होती. यासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग विभागाने ४९ कोटी ७२ लाखांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर केला असल्याचेही त्या पत्रात नमूद असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::
टेंभुर्णीला बायपास होऊनही मूळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ मधील ६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी नितीन गडकरी यांनी विशेष बाब म्हणून मोठा निधी दिला आहे. त्याशिवाय दोन्ही संतांच्या पालखी महामार्गांदरम्यान अकलूज ते वेळापूर या १२ कि.मी. रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.
- रणजितसिंह मोहिते-पाटील,
विधान परिषद सदस्य