सोलापुरातील शासकीय उपचाराकडेच ९५% कोरोनाग्रस्त रुग्णांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:18 PM2020-07-09T12:18:09+5:302020-07-09T12:24:01+5:30
सध्या खाटांची अडचण; खासगी रुग्णालयात अॅडमिट होण्याचा दिला जातोय सल्ला
राजकुमार सारोळे
सोलापूर : पॉझिटिव्ह आलेले ९५ टक्के रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचारास पसंती देत आहेत. पण सोलापुरात गेल्या तीन दिवसात रुग्ण वाढल्यामुळे सरकारी दराने खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा संबंधित रुग्णांच्या निवासस्थानी दाखल होते. त्या रुग्णांची हिस्ट्री तपासून लक्षणावरून उपचारासाठी कोठे पाठवायचे हे ठरविले जाते. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेले लोक स्वत:हून जवळच्या खासगी किंवा सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यांच्यामध्ये दिसणाºया लक्षणावरून सारी किंवा न्यूमोनियाचे संशय व्यक्त करून एक्स-रे किंवा कोरोनाची चाचणी घेण्याचा संंबंधित डॉक्टरकडून सल्ला दिला जातो. खासगी दवाखान्यात अॅडमिट असलेल्यांची खासगी लॅबमार्फत शुल्क भरून चाचणी केली जाते. अशी चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरी महापालिकेच्या आरोग्य खात्याचे पथक पोहोचते व रुग्ण किंवा नातेवाईकांची हिस्ट्री तपासली जाते.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसतील तर सिंहगड येथील कोविड केअरमध्ये दाखल केले जाते. ज्येष्ठ नागरिक, लक्षणे असलेले किंवा बीपी, शुगर व इतर आजाराच्या रुग्णांना दक्षतेसाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यास सांगितले जाते. संबंधित आरोग्य अधिकारी पॉझिटिव्ह रुग्ण किंवा नातेवाईकांना कोठे पाठवायचे हे लक्षणावरून ठरवतात, असे समन्वयक अधिकारी तपन डंके यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालये हाऊसफुल्ल
सिव्हिल हॉस्पिटल, विमा, रेल्वे हॉस्पिटल, शहरात दोन व जवळच ग्रामीण भागातील एका हॉस्पिटलमध्ये तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने सिव्हिल, विमा व रेल्वे हॉस्पिटलचे खाट फुल्ल झाले आहेत.
९५% नागरिकांची ही पसंती
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात उपचार हवे आहेत. सिव्हिलनंतर विमा व रेल्वे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यास रुग्णांचे प्राधान्य आहे. इतर आजारांमुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात व तेथे त्यांची खासगी लॅबमार्फत शुल्क आकारून चाचणी केली जाते. सरकारी चाचणी करण्यासाठी अॅडमिट व्हावे लागते, त्यामुळे लक्षणे दिसल्यास काही जण शुल्क भरून खासगी चाचणी करताना दिसून येत आहेत.
अशी आहे रुग्णांची स्थिती
सोमवार, दि. ६ जुलै रोजी जिल्ह्याची रुग्णसंख्या ३३७१ होती. यामध्ये ३०३ जणांचा मृत्यू झाला आहे तर १८२५ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १२४३ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये फक्त पॉझिटिव्ह असलेले ७२४, सौम्य लक्षणे जाणवत असलेले ३३० आणि क्रिटिकल लक्षणे असलेले १८९ रुग्ण आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांना हॉस्पिटल निवडीसाठी आॅनलाईन सेवा महापालिकेच्या वेबसाईटवर रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, याची माहिती अपडेट केली जाते. त्यामुळे प्रथम ती तपासावी असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन होण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील १५ हॉटेलला परवानगी दिली आहे. आरोग्य अधिकाºयाच्या शिफारशीनंतरच साथरोग रुग्णालयात हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यासाठी परवानगी दिली जाते. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी प्रशासनाने मोफत उपचाराची व्यवस्था केली आहे. रुग्णालयातील खाटांसंबंधी महापालिकेच्या आॅनलाईन सेवेवरून माहिती घ्यावी. खासगी रुग्णसेवा व क्वारंटाईन हे ऐच्छिक आहे.
-मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी