९८ वर्षीय सासूने सुनेपुर्वीच टेन्शन फ्री जीवनशैलीमुळे कोरोनाला हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 12:37 PM2021-04-30T12:37:17+5:302021-04-30T12:37:28+5:30
आठ दिवसात उपचार घेऊन बोरगावच्या आजी परतल्या घरी
सोलापूर : श्वास घेताना अडचण निर्माण झाल्याने बोरगाव (ता.माळशिरस) येथील तिघांची आठ दिवसापूर्वी कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ९८ वर्षीय आजी नागरबाई कृष्णात पाटील तसेच त्यांची सून कांचन हनुमंत पाटील (वय-५०) या कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या. त्यानंतर दोघींवर बोरगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू झाले. नियमित चांगला सकस आहार आणि टेन्शन फ्री जीवन जगणे हा स्थायीभाव लाभलेल्या ९८ वर्षीय सासूबाई या आठ दिवसात कोरोनावर मात करून घरी परतल्या. त्यांच्या सुनेची तब्येत देखील चांगली असून त्यांच्यावर अद्याप केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सुने अगोदर सासूने कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतल्याने आजीचं बोरगावात कौतुक होत आहे.
नागरबाई आजीचा नातू वैजिनाथ पाटील हा सैनिक असून सिक्कीम येथील सीमेवर कार्यरत आहे. वैजिनाथ पाटील यांनीच त्यांच्या आजीबद्दल लोकमतला माहिती दिली. पाटील यांनी सांगितले, आमचं कुटुंब मोठे आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीत आम्ही वाढलो. पूर्वीपासून आजींचा आहार सकस आहे. रोज पौष्टिक आहार घेतात. मर्यादित जेवण तेही नियमितपणे घेतात. रोज एक ग्लास दूध पितात. त्यांची तब्येत पूर्वीपासून चांगली आहे. आठ दिवसापूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांच्यासह घरातील तिघांची कोरोना टेस्ट करण्यात आली. तिघेही पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे त्यांना तत्काळ श्रीपूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिघांवर उपचार सुरू झाले. आजी पूर्वीपासून आरोग्याच्या बाबतीत काळजीपूर्वक वागत असल्यामुळे त्यांची तब्येत लवकर सुधारली. कोविड उपचाराला त्यांनी लगेच प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांना आठ दिवसाच्या आत डिस्चार्ज मिळाला. बुधवारी आजींची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट केल्यानंतर त्या निगेटिव्ह निघाल्या. त्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केला उपचार
पाटील यांच्या कुटुंबातील आणखीन पाच सदस्य गुरुवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यापूर्वी बुधवारी सायंकाळी कोरोनावर मात करून नागरबाई आजी घरी परतल्या. घरातील आणखी पाच सदस्य पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आजींनी सर्वांना धीर दिला. घाबरू नका. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार औषधोपचार करून घ्या. सकस आहार घ्या. दूध प्या. टेन्शन फ्री रहा, असा सल्ला घरातील सदस्यांना दिल्यामुळे घरातील सदस्यही टेन्शन फ्री होऊन उपचारासाठी तयार झाले.