५८ एकर जागेवर साचलेल्या ४० फुटांचे कचऱ्यांचे ढिगारे हटणार; बिनकामाचा कचरा जमिनीत गाडणार!
By Appasaheb.patil | Published: February 9, 2023 02:47 PM2023-02-09T14:47:44+5:302023-02-09T14:48:12+5:30
सोलापूर महापालिकेचा उपक्रम
सोलापूर : भोगाव कचरा डेपो परिसरातील ५८ एकर जागेवर साचलेले ७० ते ८० फूट कचऱ्याच्या ढिगांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठीचा बायोमायनिंग प्रकल्पाचा करारनामा पूर्ण झाला आहे. या प्रक्रियेमुळे बिनकामाचा कचरा जमिनीत गाडण्यात येणार असून, भोगाव परिसरातील ४० एकर जागा रिकामी होणार आहे. नागरिकांनी भोगाव येथील कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाबाबत न्यायालयात धाव घेतली होती.
हरित लवादाने महापालिकेला दंडात्मक कारवाई करून कचरा डेपोमुळे नागरिकांच्या समस्यांवर उपाययोजनेबाबत नोटिशीतून विचारणाही केली होती. यावर महापालिकेने बायोमायनिंग प्रकल्पातून हा विषय मार्गी लावणार असल्याचेही न्यायालयात सांगितले. स्वच्छ भारत मिशन आराखड्यातील हा बायोमायनिंग प्रकल्प होत आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून एका कंपनीला काम देण्यात आले. ही कंपनी प्रति टन ३९८ रुपये दर प्रक्रियेसाठी घेणार आहे. या प्रक्रियेमुळे ७.२ लाख क्युबिक मीटर कचरा विलगीकरण होणार आहे.
दुर्गंधी, हवा प्रदूषण, आगीवर नियंत्रण मिळविता येणार
भोगाव कचरा डेपोतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची विल्हेवाट लावण्याकरिता संबंधित मक्तेदारासोबत महापालिकेने करारनामा केला आहे. कचऱ्यामुळे या परिसरात पसरणारी दुर्गंधी, हवा प्रदूषण, दरवर्षी उन्हाळ्यात कचरा डेपो लागणारी आग आदींवर नियंत्रण येणार आहे. शिवाय महापालिकेची ४० एकर जागा रिकामी होणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
प्रकल्पांतर्गत या गोष्टी होणार
तुळजापूर रोडवरील भोगाव येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासह ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती तर सुक्या कचऱ्यातील प्रक्रिया होणारे पदार्थ वेगळे करणे, जनावरांसाठी बर्निंग सेंटर उभारणे आदींचा समावेश असलेला हा बायोमायनिंग प्रकल्प असणार आहे. निविदा प्रक्रियेत सुरक्षाभिंत, हरितपट्टा आदी गोष्टींचा समावेशही असणार आहे.
कचरा डेपो परिसरातील नागरी समस्या लक्षात घेऊन महापालिकेने स्वच्छ भारत मिशन आराखड्यानुसार बायोमायनिंग प्रकल्पाचा करारनामा पूर्ण केला आहे. या करारनामानुसार कंपनी लवकरच काम सुरू करणार आहे. यामुळे ४० एकर जागा रिकामी होऊन कचऱ्याचे ढिगारे हटणार आहेत. कचरा विलगीकरण, विघटनीकरण, बर्निंग सेंटर अशा विविध कामांचा समावेश आहे.
-शीतल तेली-उगले, आयुक्त, सोलापूर महानगर पालिका.