धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा दिलासा: निंबाळकरांनी घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 08:03 PM2024-04-20T20:03:12+5:302024-04-20T20:04:14+5:30
रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या आक्षेपावर म्हणणे मांडण्यासाठी मोहिते-पाटील यांनी दोन तासांची वेळ मागितली होती.
Madha Lok Sabha ( Marathi News ) : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रावर भाजप उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी फेटाळून लावत मोहिते पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. त्यामुळे माढ्याच्या रणांगणात मोहिते पाटील विरुद्ध नाईक निंबाळकर अशी लढत रंगणार, हे आता निश्चित झालं आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज पार पडली. मात्र त्यापूर्वी मोहिते-पाटील यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात व्यवसाय संबंधित कॉलम रिकामा सोडल्यामुळे त्यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याचा आक्षेप नाईक-निंबाळकरांनी नोंदवला होती. त्यानंतर आपले म्हणणे मांडण्यासाठी मोहिते-पाटील यांनी दोन तासांची वेळ मागितली होती. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना एका तासात म्हणणे सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार पुढील सुनावणी तीन वाजता झाली आणि सुनावणीअंती निवडणूक निवड अधिकाऱ्यांनी मोहिते पाटलांचा अर्ज वैध ठरवला.
माढ्यातील राजकीय समीकरणे बदलली!
माढा लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवान राजकीय हालचाली सुरू होत्या. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने अकलूजच्या मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर त्यांनी पक्षाला राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. दरम्यान, आता माढ्यात भाजपाला आणखी एक धक्का बसला. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. उत्तम जानकर यांनी काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. वेळापूरमध्ये जानकर आणि मोहिते पाटील घराणे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील आणि आमचे सहा महिन्यापूर्वी ठरल्याचे सांगत इनसाइड स्टोरी सांगितली.
"२०१९ च्या निवडणुकीत मला उमेदवारी दिली नाही. मोहिते पाटील यांच्या परिवारालाही उमेदवारी दिली नाही. मी सरळ जयंत पाटील यांचे घर गाठले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले नाही. मी सध्या अजित पवार गटात आहे. पण, माझा राग भाजपावर आहे. आमच्याविरोधात त्यांचा प्लॅन शिजत होतो, माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि उत्तम जानकरां ऐवजी संस्कृती सातपुते यांना आमदार करायचे आणि राम सातपुतेंना सोलापूरातून निवडून आणायचं,असा प्लॅन होता. २०१९ ला आम्ही दोघही फसलो होतो. पण, यावेळी मात्र आमचा हा प्लॅन काही आजचा नाही. बाळदादा यांना माहिती नसेल पण धैर्यशील मोहिते पाटील आणि आम्ही सहा महिन्यांपूर्वी माढ्याचा प्लॅन तयार केला आहे," असं उत्तम जानकर म्हणाले.