साळींदर पकडण्यासाठी पिंजरा लावला, त्यात अडकले उदमांजर
By शीतलकुमार कांबळे | Published: April 11, 2024 06:31 PM2024-04-11T18:31:11+5:302024-04-11T18:31:52+5:30
२२० उपकेंद्र बाळे येथील परिसरात साळींदर प्राण्यामुळे उपकेंद्रातील उपकरणांत बिघाड निर्माण होत होता.
सोलापूर : बाळे येथील महावितरणच्या उपकेंद्रात साळींदर प्राण्यामुळे उपकरणात बिघाड निर्माण होत होता. तो टाळण्यासाठी वन विभागाच्या मदतीने साळींदर पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, त्यात साळींदर न सापडता उदमांजर सापडले.
२२० उपकेंद्र बाळे येथील परिसरात साळींदर प्राण्यामुळे उपकेंद्रातील उपकरणांत बिघाड निर्माण होत होता. या उपकरणात अती उच्चदाबाचा विद्युत पुरवठा सुरु असतो. त्यामुळे साळींदर जीवितास धोका निर्माण झाला. त्यामुळे या प्राण्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र उपकेंद्राचे कार्यकारी अभियंता सोनपेठकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर वन विभाग यांच्याकडे दिले होते.
या पत्रानुसार उपकेंद्राच्या परिसरातील साळींदर प्राण्याला पकडण्यासाठी सोलापूर वन विभागाने एक मोठा पिंजरा या परिसरात लावला होता. परंतु, या पिंजऱ्यामध्ये अपघाताने उदमांजर हा प्राणी अडकला. वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांना ही घटना समजली. त्यानंतर सुरेश क्षीरसागर आणि टीमने घटनास्थळी धाव घेत त्या उदमांजराला पकडून पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
बचाव कार्यात यांचा सहभाग
या बचाव कार्यात सुरेश क्षीरसागर, लखन भोगे, संतोष धाकपाडे, सैफन मुजावर, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे, सौरभ भोसले महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. वन्यजीवप्रेमींनी या घटनेची माहिती वनविभागाचे वनपाल शंकर कुताटे यांना दिली.