केसीआर यांच्या योजनांची माहिती देण्यासाठी सोलापुरात येणार तेलंगणातून प्रचार गाडी
By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 29, 2023 06:41 PM2023-04-29T18:41:58+5:302023-04-29T18:58:00+5:30
अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी दिली माहिती
सोलापूर : महाराष्ट्रात राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत राष्ट्र समितीकडून (बीआरएस) प्रयत्न सुरू आहेत. सहा मे पासून सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्यात, वाड्या -वस्त्यांवर तेलंगाना सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रचार वाहने फिरणार आहेत. ६ जून पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत लवकरच एक गाडी सोलापुरात दाखल होणार आहे, अशी माहिती तेलंगणा सरकारचे अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी लोकमतला दिली.
मंत्री हरीश राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे जावई आहेत. राव यांचे सोलापूरकडे विशेष लक्ष असून सोलापुरातील काही दिग्गज राजकारणी व शैक्षणिक संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी बीआरएस पक्षात येणार असल्याची माहिती देखील हरिष राव यांनी लोकमतला दिली. त्यामुळे सोलापुरात लवकरच राजकीय 'गौप्य'स्फोट होण्याची शक्यता आहे.