हायवेवर टायर जाळून रस्ता रोको केल्याबद्दल सोलापुरात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Published: November 2, 2023 04:58 PM2023-11-02T16:58:14+5:302023-11-02T16:59:03+5:30
सोलापूर-पुणे हायवे आणि मार्केट यार्डासमोरील रोडवर या घटना घडल्या.
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने हायवेवर रस्ता रोको करून टायर जाळून वाहतुकीची कोंडी केल्यावरून सोलापुरातील १९ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. सोलापूर-पुणे हायवे आणि मार्केट यार्डासमोरील रोडवर या घटना घडल्या. यातील एक आंदोलन सोलापूर-पुणे हायवेवरील शहरापासून जवळ असलेल्या नेक्सा शोरुमजवळील रोडवर दुपारी २:३५ च्या सुमारास घडले.
यावेळी राम जाधव, निशांत साळवे, पवन आलुरे, कार्तिक पाटील, राज सरडे, मारुती सुरवसे, श्रीकांत भोसले, गणेश तांदळे, विनायक दत्तू, वैभव कारंडे (सर्व रा. सोलापूर) या कार्यकर्त्यांनी विनापरवाना एकत्र येऊन सोलापूर-पुणे हायवेवर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत रस्ता रोको आंदोलन छेडले. वाहतुकीला अडथळा निर्माण करून टायर जाळले. पोलिस आयुक्तांनी बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिस अंमलदार विनोद गुरुसिद्ध होटकर यांच्या फिर्यादीनुसार वरील दहा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला. या गुन्ह्याचा तपास सपोनि माने करीत आहेत.
दुसरी घटना बुधवारी रात्री सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील मार्केट यार्ड रोडवर घडली. येथे मारुती सावंत, नितीन मोहते, विकास शिंदे, नागेश सावंत, महेश सावंत, प्रशांत फाळके, तात्या गायकवाड, योगेश मोरे, टिल्लू शिंदे, अमोल कळंब (सर्व मित्र नगर, शेळगी) या कार्यकर्त्यांनी वाहतुकीला अडथळा आणण्यासाठी टायर जाळून जीविताला हानी होईल, असे कृत्य केले. ज्वालाग्रही पदार्थांचा वापर केला, अशी फिर्याद पोलिस अंमलदार सूर्यकांत कांबळे यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा तपास फौजदार ताकभाते करीत आहेत.