कर्जत, डहाणू येथील आदिवासींच्या जमीनी फसवून केल्या खरेदी; सोलापुरातील एकावर, मुंबईतील दोघांवर गुन्हा
By रवींद्र देशमुख | Published: March 12, 2023 05:24 PM2023-03-12T17:24:42+5:302023-03-12T17:25:13+5:30
कर्जत, डहाणू येथील आदिवासींच्या जमीनी फसवून खरेदीप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर : आदिवासींच्या नावावरील कर्जत, डहाणू, चिंचलखैरे येथील जमीन कमी दरात खरेदी करण्यासाठी तरुणाच्या नावे कर्ज घेऊन त्याची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचा एक व मुंबईतील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अमृत केशव पडवळे ( वय ३५, रा. रामपूर खेडपाटा, पालघर) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पडवळे यांना आरोपी अमर विजय जाधव ( रा. नवी मुंबई), यशवंत वसंतराव पाटील ( रा. कुर्ला), राजेंद्र पुंडलिक हजारे ( लोकमंगल विहार, बाळे) यांनी नोकरी लावण्याची आमिष दाखवले. त्यात महिन्याला २५ हजार रुपये देतो,असेही सांगितले.
त्यानंतर कर्जत, डहाणू, चिंचलखैरे येथील आदिवासी जमीन फिर्यादीच्या नावावर करून खरेदी केल्यानंतर कमी दरात लिलावाव्दारे घेण्यासाठी कागदपत्रात चुकीच्या नोंदी करून पडवळे यांच्या नावावर नियमबाह्य व तातडीने १ कोटी १० लाख रुपये कर्ज खासगी सहकारी बॅंकेकडुन मंजूर करून घेतले. तसेच नंतर ही रक्कम बनावट विड्रॉल स्लिप व बनावट रक्कम हस्तांतरण पत्राच्या आधारे यशवंत पाटील यांच्या बँक खात्यात फिर्यादीच्या परस्पर जमा केली. त्यानंतर कोर्टाव्दारे नोटीस पाठवून न घेतलेले १ कोटी १० लाख रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी पडवळे यांच्यावर दडपण आणत फसवणूक केली. असे फिर्यादीत नमूद आहे. यावरून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.