सोलापूरात नितेश राणेंसह तेलंगणाच्या आमदारांवर गुन्हा दाखल
By संताजी शिंदे | Published: January 7, 2024 02:31 PM2024-01-07T14:31:29+5:302024-01-07T14:32:02+5:30
शनिवारी सोलापूरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर : हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी, आमदार नितेश राणे व तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह ठाकूर यांच्यासह ८ ते १० जणांविरूद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवारी सोलापूरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा कन्ना चौकाच्या दिशेने निघाला होता. सायंकाळी ७ वाजता कन्ना चौकात मोर्चाचे रूपांतर सभे मध्ये झाले. सभे दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केले. दरम्यान तेलंगणाचे आमदार टी.राजा सिंह ठाकूर यांनीही चितावणीखोर भाषण केले. दोन्ही आमदारांच्या भाषणामध्ये दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मोर्चाचे संयोजक सकल हिंदू समाज समन्वयक सुधीर बहिरवाडे यांच्यासह अन्य ८ ते १० जणांविरूद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जे.एन. मोगल यांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस अधिकारी घाडगे करीत आहेत.