शिवबाबाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा!
By संताजी शिंदे | Published: July 4, 2024 06:51 PM2024-07-04T18:51:41+5:302024-07-04T18:51:58+5:30
हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी
सोलापूर : पूर्व आयुष्यात पोलीस कर्मचारी असलेल्या आणि पुढे जावून स्वतः ला बाबा नारायण हरी म्हणवून घेणाऱ्या बाबाच्या विरोधात देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
अशा स्वरूपाच्या घटनाच्या नंतर प्रत्यक्षात त्याला जबाबदार बाबा बुवा आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी हे नामानिराळे राहतात. काही प्याद्यांचा बळी दिला जातो हे लक्षात घेता सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी अशी देखील मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.
हा स्वयंघोषित बाबा स्वतः देवाचा अवतार असल्याचे जाहीररित्या सांगत असतो. त्यामधूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने भक्त गोळा केले आहेत. महाराष्ट्रात अंनिसच्या प्रयत्नातून झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या द्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या महाराष्ट्रातील गेल्या दहा वर्षांच्या अंमलबजावणी मध्ये सर्वधर्मीय बाबा बुवांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली आहे. हा कायदा सर्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मूलन करणारा असल्याचे सिद्ध झाले असल्याचे देखील पत्रकात नमूद केले आहे. ह्या कायद्याच्या गैर वापराची एक देखील घटना समोर आलेली नाही असे अंनिस मार्फत सांगण्यात आले आहे.
राज्यसभेत कायद्याची मागणी
आज राज्यसभेत खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी केली आहे. माननीय सभापती धनकड यांनी देखील जादूटोणाविरोधी कायद्याच्या विषयी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून सदनाच्या पुढे मांडवी असे सांगितले आहे. ती स्वागतार्ह गोष्ट आहे असे देखील या पत्रकात अंनिसने नमूद केले आहे.
श्रद्धा बाळगताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी
० हज यात्रा, अमरनाथ यात्रा अशा अनेक धार्मिक ठिकाणी दर वर्षी मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होतात. लोकांनी देखील आपल्या श्रध्दा बाळगताना आपल्या आयुष्य आणि आरोग्य याची काळजी घेवून या पाळायला हव्यात असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीने डॉ. अस्मिता बालगावकर, प्रा शंकर खलसोडे, लालनाथ चव्हाण, डॉ.राजेंद्रसिंह लोखंडे, व्ही.डी. गायकवाड, आर.डी. गायकवाड, शकुंतला सूर्यवंशी, ॲड. सरीता मोकाशी, अंजली नानल, निशा भोसले, मधुरा सलवारू, उषा शहा, डॉ.निलेश गुरव, केदारीनाथ सुरवसे यांनी केले आहे.