दागिनेचोर बालकाला अन् बाईक पळवणाऱ्या तरुणाला केले जेरबंद
By विलास जळकोटकर | Published: October 23, 2023 03:50 PM2023-10-23T15:50:13+5:302023-10-23T15:50:46+5:30
सोलापूर : दोघांकडून १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : पोलिसांचा ससेमिरा चुकवत दागिने घेऊन पसार होणाऱ्या बालकाला आणि चोरीची बाईक विक्रीसाठी थांबलेला तरुण अशा दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले. यातील एक विधीसंघर्ष बालक असून, दुसऱ्या तरुणाचं नाव ईश्वर श्रीनिवास बिरु (वय १९, रा. शांतीनगर, सोलापूर) असल्याचं समोर आले आहे.
घरफोड्यांचे सत्र वाढल्यामुळे चोरांना पकडण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून प्रेट्रोलिंग सुरु आहे. या दरम्यान, खबऱ्यामार्फत एक विधीसंघर्ष बालक घरफोडीतील ८५ हजारांची दागिने घेऊन जात असल्याची माहिती पोलीस अंमलदार वाघे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने व फौजदार विक्रम रजपूत यांना कल्पना देऊन सापळा लावला. खबऱ्याच्या माहितीनुसार संबंधित बालकाला पकडून त्याची झडती घेण्यात आली. यात त्याच्याकडे ३० हजारांचे सोन्याचे पेंडल आणि ५५ हजार रुपयांचे गंठण असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
याशिवाय पोलीस अंमलदार याळगी यांना चोरीची बाईक विक्रीसाठी एक चोरटा येत असल्याची खबर मिळाली. तेथे पथकाने सापळा लावला. नमूद वर्णनाचा चोरटा तेथे आल्यानंतर सापळा लावून त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे नाव ईश्वर श्रीनिवास बिरु असल्याचे समजले. त्याच्याकडून ६० हजार रुपयांची चोरीतील बाईक जप्त केली. दोन्ही कारवाईत एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.