चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील ९२ सभासदांना नाशिकच्या कंपनीने लावला चुना
By रूपेश हेळवे | Published: August 18, 2023 03:01 PM2023-08-18T15:01:54+5:302023-08-18T15:02:28+5:30
फिर्यादी मुत्याल यांची आरोपींची ओळख कंपनीतील एजंटशी झाली.
सोलापूर : कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास ४५ दिवसानंतर प्रतिमाह १५ टक्के रक्कम आणि गिफ्टचे आमिष दाखवून सोलापुरातील ९२ सभासदांची ९३ लाख ९४ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वाती लालुप्रसाद मुत्याल ( वय २४, रा. आडम प्लॉट निलम नगर) यांच्या फिर्यादीवरून नाशिक मधील तिघांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन सुधाकर वरखडे ( रा. ओम नगर, जेलरोड, नाशिक), अमोल नरेंद्र खोंड ( रा. नाशिक), अरविंद मेहता ( रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
फिर्यादी मुत्याल यांची आरोपींची ओळख कंपनीतील एजंटशी झाली. त्या एजंटाच्या माध्यमातून त्यांनी नाशिक येथील सिक्रेट मल्ट्रीट्रेड प्रा. लि. कंपनीची माहिती मिळाली. त्या कंपनीचे संचालक आरोपी यांनी विविध आमिष दाखविले.
शिवाय या अमिषाला बळी पडून जवळपास ९२ जणांनी पैसे भरले. यात फिर्यादी यांनी ४ लाख १० हजार रुपये गुंतवले. त्याबदल्यान आरोपींनी फक्त ९० हजार परत देऊन उर्वरित रक्कम न देता त्यांची व इतर सभासदांची ९३ लाख ९४ हजार रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.