गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाखाची मागणी करणारा फौजदार ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
By विलास जळकोटकर | Published: December 1, 2023 05:53 PM2023-12-01T17:53:37+5:302023-12-01T17:53:49+5:30
ज्या ठाण्यात ड्यूटी केली तेथे गुन्हा...
सोलापूर : गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी दोन लाखांची मागणी करुन एक लाखाच्या तजजोडीने लाचेची मागणी करुन स्वीकारण्यास संमती दिल्याचे सिद्ध झाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे फौजदार विक्रम प्रतापसिंह रजपूत (वय- ४०) यांना ॲन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. जेथे ड्यूटी केली त्याच ठाण्यात रजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला गेला.
या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध ॲट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी फौजदार विक्रम प्रतापसिंह रजपूत यांनी स्वत:सह पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावे २ लाखांची मागणी केली. तडजोडीने ती रक्कम १ लाखावर आणून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे ६ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले.
फौजदार रजपूत यांनी बेकायदेशीररित्या लाच म्हणून रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ व ७ अ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरीषकुमार सोनावणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, संतोष नरोटे, स्वामीराव जाधव, गजानन किणगी, श्याम सुरवसे यांनी पार पाडली.
पंधरा दिवसात एका ठाण्यात दोन कारवाया
पंधरा दिवसाच्या कालावधीत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या दोन कारवाया अँटी करप्शनच्या पथकाकडून करण्यात आली. या अगोदर प्रमोद कांबळे आणि आता फौजदार विक्रम रजपूत यांच्यावर कारवाई झाली आहे.