ऊसाचं बिल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मालट्रकनं उडवलं अन् जागीच झाला ठार
By विलास जळकोटकर | Published: June 20, 2023 04:56 PM2023-06-20T16:56:24+5:302023-06-20T16:56:42+5:30
ट्रकचालक पसार : माढा तालुक्यातील अकोले शिवारात अपघात
सोलापूर : दहा महिने जीवापाड जपलेला ऊस कारखान्याला घातला. त्याचं बील आणण्यासाठी दुचाकीवरुन चाललेल्या वृद्ध शेतकऱ्याला मालट्रकनं उडवलं आणि काळानं त्यांना दवाखान्याला नेण्याचाही अवधी दिला नाही. ते जागीच गतप्राण झाले. सोमवारी सकाळी १०:३० च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.
चांगदेव नामदेव देशमुख (वय ६५, रा. वांगी नं. १, ता. करमाळा) असे मृत पावलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. यातील मयत शेतकरी चांगदेव नामदेव देशमुख यांनी त्यांच्या शेतामध्ये लागण केलेला ऊस चालू हंग़ामात कारखान्याला घातला होता. त्याचं बिल आणण्यासाठी ते सोमवारी सकाळी वांगी नं. १ या गावाहून (एम. एच. ४५ आर ० ६०२) या बाईकवरुन टेंभुर्णीकडे करमाळा रोडने निघाले होते.
साधारण साडेदहाच्या सुमारास बाईक माढा तालुक्यातील अकोले खुर्दच्या शिवारात आली असताना अचानक समोरुन करमाळ्याहून टेंभुर्णीकडे येणाऱ्या ट्रकचालकाने (के ए २२ सी ३२८३) रोडची स्थिती न पाहता वाहन चालवून दुचाकीस्वार चांगदेव देशमुख यांना धडक दिली. यात बाईकसह चांगदेव रोडवर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि यातच ते जागीच ठार झाले, असे मयताचे पूत्र नागनाथ चांगदेव देशमुख यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार तांबोळी करीत आहेत.
अन् बील घरी पोहोचलंच नाही जीव मात्र गेला
आगामी शेतीसाठीच्या तरतुदीसाठी, संसारोपयोगी गरजांसाठी ऊसाचंव आणावं म्हणून गेलेल्या चांगदेव देशमुख यांना बिल आणण्यासाठी पोहचण्यापूर्वीच ट्रकच्या रुपानं काळ धाऊन आला आणि वाटेतच त्यांना जीव गमावावा लागला. या अकाली मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.