सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडीनजीकच्या अपघातात कोल्हा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 04:06 PM2022-06-21T16:06:15+5:302022-06-21T16:06:20+5:30
सोलापूर : पुणे- सोलापूर महामार्गावरील कोंडी येथे झालेल्या अपघातात कोल्हा ठार झाला. वन्यजीव प्रेमींनी ही माहिती वन विभागाला दिली. ...
सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कोंडी येथे झालेल्या अपघातात कोल्हा ठार झाला. वन्यजीव प्रेमींनी ही माहिती वन विभागाला दिली. कोल्ह्याचा मृतदेह विच्छेदनासाठी वन विभागाने ताब्यात घेतला.
सोमवार, २० जून रोजी दुपारी १२ वाजता कोंडी येथे एका कोल्ह्याचा अपघात झाला. कोंडी येथील रहिवासी महेश मोरे यांनी याची माहिती वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सर्कलचे सुरेश क्षीरसागर यांना दिली. त्यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधला. वनरक्षक यशोदा आदलिंगे यांनी योगेश, बसवराज मडवळकर, दशरथ कांबळे यांना पाठविले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेतला.
दळणवळण लवकर व्हावे यासाठी प्रशस्त असे महामार्ग तयार केले आहेत. त्याचा फायदा फक्त माणसांना होत असून, मुके वन्यजीव, पशू-पक्ष्यांना मात्र नाहक आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. भविष्यात रस्ता ओलांडताना वन्यजीवांचा नाहक बळी जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. ज्या महामार्गांवर वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रालगतच्या महामार्गावर उड्डाणपूल बांधावेत, अशी मागणी वन्यजीवप्रेमींनी केली.