मोलमजुरी करणाऱ्या जळगावातील महिलेकडून विठुचरणी सोन्याची लगड
By काशिनाथ वाघमारे | Published: May 19, 2024 06:21 PM2024-05-19T18:21:42+5:302024-05-19T18:21:54+5:30
महिला भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सोलापूर : मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शकुंतला एकनाथ वाघ (रा. मजरे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या महिलेने शनिवारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस १ लाख ४१ हजार रुपयांचे २ तोळे लगड (तुकडा) सोने दान केले. याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
या दानशूर महिला भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.
लग्नानंतर विभक्त झालेल्या शकुंतला वाघ भाऊ तुकाराम एकनाथ वाघ यांच्याकडे राहायला गेल्या. उदरनिर्वाह करून मोलमजुरी करत त्यांनी मजरे या गावी दोन एकर जमीन खरेदी केली. त्या जागेत सन २०१८ मध्ये विठ्ठल- रुक्मिणीमातेचे मंदिर उभारले. काही दिवसांत मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण झाले. दरवर्षी तेथे पांडुरंगाचा वाढदिवस साजरा होतो. आपल्या जमापुंजीतून त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास २ तोळे लगड (तुकडा) सोने दान करून आपली इच्छा पूर्ण केली आहे.