भारताच्या दिग्गज पक्षीतज्ज्ञ अन् छायाचित्रकारांच्या समूहामध्ये सोलापूरचे डॉ. व्यंकटेश मेतन; जाणून घ्या सविस्तर
By Appasaheb.patil | Published: March 15, 2024 12:23 PM2024-03-15T12:23:17+5:302024-03-15T12:24:37+5:30
एक हजाराहून जास्त पक्षी प्रजातींचे छायाचित्रे काढणाऱ्या भारतातील दिग्गज पक्षीतज्ज्ञ व छायाचित्रकारांच्या समूहामध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.
सोलापूर : पक्षीनिरीक्षक व राष्ट्रस्तरीय वाईल्ड लाइफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी भारतातील एकूण १३६९ पक्षी प्रजातींपैकी १००० पक्ष्यांचे निरीक्षण करून त्यांची छायाचित्रे काढण्यात यश मिळविले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्यांनी मागील २७ वर्षे सातत्याने पक्षीनिरीक्षण, पक्ष्यांवरील सखोल अभ्यास, भारतभर प्रवास करून अनेक अभयारण्य व जंगलांना भेट, १० वर्षे उत्तम कॅमेराने छायाचित्रे टिपली, व्यस्त वेळेतून खूप वेळ खर्ची घालून, चिकाटीने खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी पक्ष्यांचे निरीक्षण व छायाचित्रे काढून त्यांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. एक हजाराहून जास्त पक्षी प्रजातींचे छायाचित्रे काढणाऱ्या भारतातील दिग्गज पक्षीतज्ज्ञ व छायाचित्रकारांच्या समूहामध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.
दरम्यान, डॉ. व्यंकटेश मेतन हे प्रसिद्ध पक्षीनिरीक्षक, राष्ट्रस्तरीय वाईल्ड लाइफ फोटोग्राफर, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. अनेक तास एकाग्रतेने निसर्गातील अनेक प्रजातींच्या पक्ष्यांच्या शरीराची रचना, त्यांचे रंग, त्यांचे वेगळेपण, त्यांच्या हालचाली, त्यांचे व्यवहार, त्यांचे खाद्य, घरटी व जीवनचक्र अशा अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करीत आहेत. निसर्गामधील अनेक आश्चर्यकारक घटना त्यांनी त्यांच्या नजरेत आणि कॅमेरामध्ये टिपले आहेत.
भारतात आढळणाऱ्या काही महत्त्वाच्या आणि दुर्मीळ पिवळा तापस, मोठा छत्रबलाक, खुरपी बदक, चतुरंग बदक, शेंडी बदक, गिजरा बदक, काळा बाज, शाही गरुड, हिवाळी तुरुमती, अमूर ससाणा, सामान्य लावा, हुबारा, तपकिरी फटाकडी, पाण फटाकडी, लांब शेपटीचा कमलपक्षी, सोन चिखल्या, नदी टिटवी, कवड्या टिलवा, करडा टिलवा, उचाट्या, छोटा कोकीळ, हुमा घुबड, बेडूक तोंड्या, फ्रँक्लिनचा रातवा, कंठेरी धीवर, काळा नीलपंख, महाधनेश, रान धोबी, लाल कंठाची तीरचिमणी, नीलपरी, शिटीमार रानभाई, काश्मिरी माशीमार, ठिपकेवाली सर्पिका, रेखांकित भारिट, काळ्या छातीची सुगरण, तिरंदाज, समुद्री बगळा, पांढरा करकोचा, रोहित, कलहंस, चक्रवाक, मलीन बदक, चतुरंग बदक, माळढोक, कास्य पंखी कमळपक्षी, वगैरे पक्ष्यांचे निरीक्षण करून त्यांची सुंदर छायाचित्रे काढली आहेत.