कारमधील कुटुंबीयांवर जीवघेणं संकट, ट्रॅफिक पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 10:20 AM2022-10-27T10:20:00+5:302022-10-27T10:30:52+5:30
सोलापूर शहरातील शांती चौक येथून स्विफ्ट कारमध्ये एक कुटुंब दिवाळीनिमित्त प्रवास करत होते
सोलापूर - ट्रॅफिक पोलिसांबद्दल नेहमीच वाहनधारकांच्या मनात भीती आणि चीड असते. वाहतूक पोलीस हवालदार म्हटलं की गाडी अडवणार आणि दंड भरावा लागणार, अशी आपली समजूत असते. अनेकदा वाहतूक पोलिसांसोबत बाचाबाचीही होत असते. मात्र, आपल्या सुरक्षितेसाठी, सुरक्षित प्रवासासाठीच ते वारंवार आपल्यासोबत हुज्जत घालत असतात. त्याला काही अपवादही असू शकतात. सोलापूरातील वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे.
सोलापूर शहरातील शांती चौक येथून स्विफ्ट कारमध्ये एक कुटुंब दिवाळीनिमित्त प्रवास करत होते. सोलापूर अक्कलकोट मार्गावरील चौकात स्विफ्ट कार आल्यावर या कारमधील सीएनजी टाकीतून वायु गळती होत असल्याचं तिथे असेलल्या वाहतूक पोलिसाच्या ते लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब कार थांबवत कारमधील कुटुंबाला बाहेर काढलं. तातडीनं अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत सदर वाहनाची गॅस गळती बंद केली. वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाला जीवनदान मिळालं. संबंधित चारचाकी कारचा नंबर PB 08 DW 9897 असा आहे. यावेळी, गाडीच्या ठिकाणी स्थानिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर, काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूकही थांबली होती.
सोलापूर - वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली, वायुगळती होत असलेली कार थांबवली pic.twitter.com/MIQ1XInTb2
— Lokmat (@lokmat) October 27, 2022
दरम्यान, वाहतूक पोलिसांचे संबंधित कुटुंबीयांनी आभार मानले. तसेच, अग्निशमन दलाचेही आभार मानले. ट्रॅफिक पोलीस केवळ पावत्याच न फाडता वाहनधारकांच्या सुरक्षेचीही काळजी घेत असतात, हेही या प्रसंगातून दिसून आले.