उजनीच्या उजव्या कालव्यावरील कॅनॉल पुलाला मोठी गळती; धबधब्याचे स्वरूप
By विठ्ठल खेळगी | Published: May 2, 2023 10:13 AM2023-05-02T10:13:05+5:302023-05-02T10:13:59+5:30
उंचावरून पडणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना धबधब्याचे रूप पाहायला मिळत आहे.
सोलापूर : उजनी उजवा कालवा शेवरे हद्दीतून संगम (ता. माळशिरस) येथे भीमा नदीवरून पुलामार्गे पुढे पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात जात आहे. या पुलावरील पाईप जॉईन्ड मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागली. २० तासाहून अधिक काळ हे पाणी मोठ्या प्रमाणात लिकेज होत असून पुलाशेजारील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उंचावरून पडणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना धबधब्याचे रूप पाहायला मिळत आहे.
उन्हाळ्याचे दिवस असलेले उजनी उजवा कालव्याचे पाणी हे माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्याला शेतीसाठी आणि पिण्यासाठी जाते. माळशिरस तालुक्यातील संगम या ठिकाणी कॅनॉल फुटल्याने मंगळवेढा या ठिकाणी पाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे तत्काळ कॅनॉल दुरुस्त करून मंगळवेढा येथील शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे. संगम परिसरातील शेतकऱ्यांनी व राजकीय नेत्यांनी पाटबंधारे यांच्या अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने जवळपास दिवसभर पाणी वाहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.