विक्रीसाठी विनापरवाना काळवीटाची शिंगे बाळगल्याप्रकरणी एकास अटक
By संताजी शिंदे | Updated: June 17, 2024 19:47 IST2024-06-17T19:47:22+5:302024-06-17T19:47:46+5:30
या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४८,४९(ब), ५१ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रीसाठी विनापरवाना काळवीटाची शिंगे बाळगल्याप्रकरणी एकास अटक
संताजी शिंदे-सोलापूर : विनापरवाना विक्रीसाठी स्वत:च्या जवळ काळवीटाची शिंगे बाळगल्याप्रकरणी एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच शिंगे हस्तगत करण्यात आले आहेत. हि कारवाई १६ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
काळवीटाची शिंगे बेकायदा विक्री करण्यासाठी एका इसम बाळीवेस येथे येणार असल्याची माहिती, गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने बाळीवेस येथे सापळा रचला, तेव्हां एक इसम तेथे आला. सांगण्यात आलेले वर्णन व संशयास्पद हलचालीवरून पथका त्याच्या जवळ गेले. झडती घेतली असता, त्याच्या जवळ १८ इंच लांबीचे दोन, १४ इंच लांबीचे दोन तर १० इंच लांबीचा एक असे एकूण पाच शिंगे आढळून आले. खात्री केली असता, हि शिंगे काळवीटाची असल्याचे लक्षात आले.
पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता, हि शिंगे बेकायदा विक्रीसाठी आणण्यात आल्याचे निदर्शनास आले. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकाने हि कामगिरी पार पाडली. या प्रकरणी अजित अविनाश सरवदे (वय ३४ रा. हब्बू वस्ती, बुध्द विहार, देगाव रोड सोलापूर) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४८,४९(ब), ५१ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.