सोलापूर : भावाच्या लग्नासाठी निघालेल्या विवाहितेचे पावणे दोन लाखांचे दागिने प्रवासात लांबविले
By काशिनाथ वाघमारे | Published: May 4, 2023 05:49 PM2023-05-04T17:49:42+5:302023-05-04T17:50:14+5:30
भावाच्या लग्नासाठी पित्यासोबत माहेरी निघालेल्या विवाहितेचे १ लाख ६५ हजारांचे साडे तीन तोळे दागिने चोरट्यांनी एसटी बस प्रवासात लांबविल्याची घटना सोलापूर-बार्शी मार्गावर घडली.
सोलापूर : भावाच्या लग्नासाठी पित्यासोबत माहेरी निघालेल्या विवाहितेचे १ लाख ६५ हजारांचे साडे तीन तोळे दागिने चोरट्यांनी एसटी बस प्रवासात लांबविल्याची घटना सोलापूर-बार्शी मार्गावर घडली.
ही घटना १ मे रोजी सायंकाळी घडली. याबाबत वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार बार्शी तालुक्यात ढोराळे येथील शिवाजी पंढरी काकडे यांच्या मुलाचा विवाह ९ मे रोजी निश्चित करण्यात आला. त्यासाठी ते विवाहित मुलीला माहेरी आणण्यासाठी १ मे रोजी सोलापूरला तिच्या सासरी आले होते. सासरमधून मुलीला घेऊन आपल्या गावी परतले. घरी आल्यानंतर मुलीने स्वत:चे दागिने आईकडे देण्याकरिता बॅग पाहिली असता आत ठेवलेले साडेतीन तोळे सोने चोरट्यांनी लांबवल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी वैराग पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. प्रवासादरम्यान चोरट्यांनी बॅगमध्ये ठेवलेले दीड तोळे वजनाचे नेकलेस, नऊ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या असा एकूण सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला.