कांद्याच्या काट्यावरून यार्डात गोंधळ; पोलिस अन् कामगारांमध्ये बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 12:49 PM2022-12-12T12:49:54+5:302022-12-12T12:50:49+5:30
सोमवारी, पावणेआठ वाजता हमाल कामगारांनी सकाळी आठला काटा करण्याचा निर्णय कोणाला विचारून घेतलात, असा सवाल करीत गोंधळ सुरू केला.
विठ्ठल खेळगी
सोलापूर : कांदा चोरी रोखण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने पहाटेऐवजी सकाळी आठ वाजता कांदा काटा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात गोंधळ करीत पहाटे पाच वाजताच काटा करण्याची मागणीचा जोर लावला. सुमारे तासभर गोंधळ सुरू होता.
सोमवारी, पावणेआठ वाजता हमाल कामगारांनी सकाळी आठला काटा करण्याचा निर्णय कोणाला विचारून घेतलात, असा सवाल करीत गोंधळ सुरू केला. दरम्यान बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सकाळी साडेदहा वाजता पोलिसही घटनास्थळी पोहोचले. समजूत काढत असताना पोलिस आणि कामगारांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर चेअरमन आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी फोनवरून झाल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी चार वाजता व्यापारी आणि कामगारांची बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर हमाल कामगार शांत झाले.
लिलावास दोन तास विलंब
दररोज अकरा वाजता कांदा लिलाव होतो. सोमवारी या गोंधळामुळे लिलावास दोन तास विलंब झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर सकाळी अकरा वाजता कामगारांनी काटा करण्यात सुरुवात केली. त्यानंतर व्यापारी एक वाजता लिलाव करण्याचा निर्णय घेतला.
पहाटे कांदा चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे कांदा काटा सकाळी आठ वाजता करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी सकाळी हमाल कामगारांनी गोंधळ करीत त्याचा विरोध केल्याची माहिती मिळाली. ही बाहेरगावी आहे. चार वाजता चेअरमनांसोबत व्यापारी व कामगारांची बैठक होणार आहे. त्यात तोडगा काढण्यात येईल. -श्रीशैल नरोळे, व्हाईस चेअरमन, बाजार समिती