सोलापूरच्या मोहोळ गावचा प्लंबर बनला स्टार यू-ट्युबर
By महेश गलांडे | Published: July 31, 2022 06:04 AM2022-07-31T06:04:29+5:302022-07-31T06:04:53+5:30
टिकटॉकवर व्हिडिओ पाहून आपणही असे व्हिडिओ बनवावेत, अशी संकल्पना त्याला सुचली.
- महेश गलांडे, सीनिअर कंटेन्ट एक्झिक्युटिव्ह,
लोकमत डॉट कॉम
ज्याला ई-मेलही माहिती नव्हता, ज्याचा इंटरनेटशी संबंधही नव्हता, प्लंबिंगचा पाना हेच ज्याचं शस्त्र होतं, तो गणेश शिंदे २ ते ३ वर्षांत फेमस यू-ट्यूबर बनला. हातातील पान्याच्या जागी मोबाइल अन् ट्रायपॉड आला अन् गणेशचं आयुष्यच बदललं. गणेशने बी.ए. भाग-२ पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर, पूर्णवेळ प्लंबरचा व्यवसाय सुरू केला.
याच कालावधीत टिकटॉकवर व्हिडिओ पाहून आपणही असे व्हिडिओ बनवावेत, अशी संकल्पना त्याला सुचली. त्यातून, कॉमिक कंटेन्ट बेस व्हिडिओ बनवले अन् हळूहळू त्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. मात्र, सरकारने चायना ॲपवर बंदी घातली अन् गणेशरावांच्या मनोरंजनाला कायमचा ब्रेक मिळाला. त्यांनी यूट्युबकडे आपला मोर्चा वळवला. इंटरनेटवरून माहिती घेत यूट्युब चॅनल सुरू केले. गणेश आणि योगिता हे आपल्या मुलीसह व्हिडिओ बनवतात. त्यांच्या चॅनलचं मुख्य आकर्षण हे त्यांचा ग्रामीण बाज, गावरान बोलीभाषा अन् २ ते ३ वर्षांची कन्या शिवानी आहे.
त्यांच्या चॅनेलचं नावही सरळ-सोपं आहे. ‘गणेश शिंदे मोहोळ’ या नावाने त्यांनी २३ मे २०१९ रोजी हे चॅनल सुरू केले. मात्र, सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी मुलगी शिवानीला घेऊन जो व्हिडिओ बनवला तो तुफान व्हायरल झाला आणि त्याच महिन्यातील व्हिडिओला ५ कोटी व्ह्यूज मिळाले. सबस्क्रायबर्स ८ लाख ६५ हजार एवढे असून. दरमहा १ लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळते, असं त्यांचं म्हणणं आहे.