सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्र मैदानावर चक्कर येऊन पडल्यानं पोलीस जखमी
By विलास जळकोटकर | Published: February 7, 2024 05:16 PM2024-02-07T17:16:39+5:302024-02-07T17:16:59+5:30
सोलापूर शहरापासूनच जवळ सोलापूर विद्यापीठाच्या लगत केगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे.
सोलापूर : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर परेडचा सराव करताना एक प्रशिक्षणार्थी पोलीस तरुण मैदानावर चक्कर येऊन पडला. बुधवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. युवराज अंकुश राठोड (वय २४, रा. पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगाव, सोलापूर) असे या जखमी तरुणाचे नाव आहे.
सोलापूर शहरापासूनच जवळ सोलापूर विद्यापीठाच्या लगत केगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. येथे नव्यानं भरती झालेल्या पोलिसांना प्रशिक्षण देण्या येते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे यातील जखमी युवराज राठोड हा तरुण मैदानावर परेडचा सराव करीत होता. सकाळी पावणेआठच्या सुमारास त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रशिक्षणार्थी पोलीस एकत्र जमले. त्यांनी वरिष्ठांना याबद्दलची कल्पना दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी त्याला तातडीने येथील ,शासकीय रुग्णालयात दाखल केले. मैदानावर पडल्याने त्याच्या हनुवटीवर जखम झाली आहे. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरु केले. त्याला आराम करण्यास सांगितले असून तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.