बैलजोडी विक्रीचे लाख रुपये अन् मोटारसायकल परत न करता सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यास फसवले
By काशिनाथ वाघमारे | Published: March 14, 2024 04:58 PM2024-03-14T16:58:55+5:302024-03-14T17:00:06+5:30
लाख रुपये अन् मोटारसायकल परत न दिल्याने सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने सख्ख्या मेहुण्याविरुद्ध पांगरी पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : शेती मशागतीसाठी घेतलेली बैलजोडी विक्री करून आलेले लाख रुपये अन् मोटारसायकल परत न दिल्याने सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने सख्ख्या मेहुण्याविरुद्ध पांगरी पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली.
याप्रकरणी पोलिसांनी सूरज शेळहाळकर (रा.उदगीर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सेवानिवृत्त पोलिस अधिकारी देवराम दगडू वडमारे (वय ६७, रा. बार्शी, सध्या अंधेरी, मुंबई) यांनी पांगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
जहानपूर हद्दीत देवराम वडमारे यांच्या शेती मशागतीसाठी सन २०१९ मध्ये सूरज शेळहाळकर याने १ लाख १० रुपयांस बैलजोडी घेऊन दिली होती. ती बैलजोडी मशागतीस योग्य नसल्याने परत विकल्यानंतर आलेले एक लाख रुपये आणि ८० हजार रुपये किमतीची मोटारसायकल दोन वर्षे वापरासाठी मागून नेली होती. तीही अद्यापपर्यंत परत दिली नाही. त्यास वारंवार पैसे मागूनही तो देण्यास नकार देत राहिला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शब्बीर शेख हे करीत आहेत.