सांगोल्यात सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घर फोडून पहाटे सात तोळ्यांचे दागिने लंपास
By काशिनाथ वाघमारे | Published: May 2, 2023 03:40 PM2023-05-02T15:40:02+5:302023-05-02T15:41:36+5:30
बाळकृष्ण निवृत्ती घोरपडे (रा.सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.
सोलापूर : चोरट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घर फोडून लाकडी तिजोरीतील सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख १५ हजार रुपये असा सुमारे तीन लाख तीन हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. ही घटना ३० एप्रिल रोजी पहाटे ४:३० वा.च्यापूर्वी सांगोला येथे एखतपूर रोडवर दत्तनगर येथे घडली. याबाबत बाळकृष्ण निवृत्ती घोरपडे (रा.सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सेवानिवृत्त प्रा. बाळकृष्ण घोरपडे हे पत्नी व मुलीसह सांगोल्यात एखतपूर रोडवर दत्तनगर येथे निवासी राहतात. २९ एप्रिल रोजी रात्री ९:३० च्या सुमारास त्यांनी पत्नी व मुली यांच्यासोबत जेवण आटोपले. त्यानंतर पती-पत्नी एका बेडरूम मध्ये तर मुलगी तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपली होती. दरम्यान चोरटे मध्यरात्री आले आणि त्यांच्या घरात प्रवेश करून लाकडी तिजोरीच्या कपाटात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र, दोन तोळे सोन्याचे गंठण, दोन ग्रॅम सोन्याचे कर्णफुले, तीन तोळे सोन्याचे गंठणसह आणि रोख १५ हजार रुपयेचा ऐवज चोरून पोबारा केला.
दुस-या दिवशी अर्थात ३० एप्रिल रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे ते झोपेतून उठले. कपाटाला अडकवलेला टी-शर्ट अंगात घालून पॅन्ट शोधत असताना ती न दिसल्याने त्यांनी लाईट लावली. त्यावेळी बेडच्या बाजूला असलेली लाकडी तिजोरी उघडी दिसली, तिजोरीतील कागदपत्रे, कपडे इतर साहित्य अस्ताव्यस्त व विस्कटलेले दिसले. त्यांनी लागलीच पत्नीला झोपेतून उठवून घरात चोरी झाल्याचे लक्षात आणून दिले.