दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घातला
By काशिनाथ वाघमारे | Published: April 6, 2024 07:02 PM2024-04-06T19:02:00+5:302024-04-06T19:02:31+5:30
या घटनेनंतर रिक्षाचालकास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोलापूर: रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहत उभा असताना ओळखीच्या दोघांनी दारू पिण्यास पैसे मागितले. रिक्षाचालकाने पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या चौकात ४ एप्रिल रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. याबाबत जखमी रिक्षा चालक संदीप राजेंद्र चव्हाण (वय ३८, रा. वाणी प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी विकास दांडगे व बाळू देशमुख (दोघे रा. वाणी प्लॉट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी फिर्यादी हा कॅन्सर हॉस्पिटल चौकात रिक्षा लावून प्रवाशांची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी विकास आणि बाळू हे दोन आरोपी आले आणि दारू पिण्यास १०० रुपये मागितले. पैसे द्यायला नकार देताच ‘तू या चौकात धंदा करावयाचा नाही..’ म्हणत त्यास शिवीगाळ करून डोक्यात दगड मारून रक्तबंबाळ केले. या घटनेनंतर रिक्षाचालकास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.