यवतजवळ पहाटे आराम बसच्या अपघातात सोलापुरातील पादत्राण कारखानदाराचा मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Published: October 26, 2023 01:46 PM2023-10-26T13:46:37+5:302023-10-26T13:46:49+5:30
शेरखाने हे जोडभावी पेठेत वडिलोपार्जित पादत्राणाचा कारखाना सांभाळताहेत.
सोलापूर : पुणे जिल्ह्यात यवतजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या आराम बसच्या अपघातात सोलापुरातील पादत्राण कारखानदाराचा मृत्यू झाला तर त्याचा जोडीदार जखमी झाला.
बाळासाहेब जालिंदर शेरखाने (वय ४२, रा. जोडभावी पेठ) असे मरण पावलेल्या पादत्राण कारखानदाराचे नाव असून जखमी जोडीदार संतोष बनसोडे (वय ४०) याच्यावर लोणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळासाहेब शेरखानेच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक आणि मित्रांनी त्यांच्या घरी गर्दी केली.
शेरखाने हे जोडभावी पेठेत वडिलोपार्जित पादत्राणाचा कारखाना सांभाळताहेत. ते एक देवीभक्तही आणि संत हरळय्या समाज सेवा नवरात्र महोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष होते. मंगळवारी देवीची मिरवणूक उरकून गुरुवारी पुण्यात पादत्राणाच्या कामासाठी जखमी संतोषसोबत जाचचे निश्चित केले.
ते दोघे बुधवार, २५ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता सोलापुरातून खासगी आराम बसने पुण्याला निघाले. गुरवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान त्यांची आराम बस ही यवतजवळ सिमेंट घेऊन निघालेल्या वाहनावर आदळली. या अपघातात शेरखाने आणि बनसोडेंसह अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तत्काळ लोणीजवळील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शेरखाने यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लोणीहून तत्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
सोशल मीडियावर श्रद्धांजली...
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संजय शिंदे आणि कार्यकर्त्यांनी शेरखाने यांच्या घरी धाव घेतली. पहाटे पाच वाजता काही कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी ससून रुग्णालयाकडे निघाले. मात्र अपघातातून बाळासाहेब वाचू शकले नाहीत हे समजताच अनेक मित्रांनी सोशल मीडियावर फोटो टाकून श्रद्धांजली वाहिली.