सरसकट नळपट्टी लावण्याविरोधात सर्वपक्षियांना एकत्र घेऊन स्वाक्षरी मोहिम राबविणार
By राकेश कदम | Updated: July 28, 2023 17:35 IST2023-07-28T17:33:36+5:302023-07-28T17:35:41+5:30
बेरिया म्हणाले, महापालिका नवीन नळ कनेक्शन देताना मीटरचे पैसे भरुन घेते. प्रत्यक्षात एकाही नळाला मीटर बसविलेले नाही.

सरसकट नळपट्टी लावण्याविरोधात सर्वपक्षियांना एकत्र घेऊन स्वाक्षरी मोहिम राबविणार
शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा न करणारी महापालिका आता घरोघरी नळ आणि नळ मीटर लावण्याची योजना राबवित आहे. ही योजना लोकांची दिशाभूल करणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या सरसकट नळपट्टी आकारणीविरोधात सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून स्वाक्षरी मोहिम राबविणार असल्याची घोषणा माजी महापौर यु.एन. बेरिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
बेरिया म्हणाले, महापालिका नवीन नळ कनेक्शन देताना मीटरचे पैसे भरुन घेते. प्रत्यक्षात एकाही नळाला मीटर बसविलेले नाही. पाच-सहा वर्षापूर्वी नव्या मीटरची खरेदी देखील करण्यात आलेली होती. सदरचे मीटर न बसविल्याने धुळ खात राहिले. नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड अनियमित पाणी पुरवठा होताे. मीटरने आकारणी झाल्यास वार्षिक आकारणीपेक्षा ही कमी रक्कम होईल या भितीपोटी मीटर बसविण्याचे काम थांबविण्यात आले. आता पुन्हा पाणी न देता खासगी नळाची आकारणी करण्याचा निर्णय जनतेवर अन्याय करणारा आहे. हा निर्णय रद्द झाला पाहिजे. या निर्णयाविरुध्द स्वाक्षरी मोहिम राबवून सरकारला पाठवू.