सोलापुरात आढळला अजगरासारखा डुरक्या घोणस

By विलास जळकोटकर | Published: June 10, 2023 05:56 PM2023-06-10T17:56:34+5:302023-06-10T17:59:59+5:30

बाळे परिसरात राहणारे विकास गायकवाड नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना त्यांच्या घरामध्ये हा डुरक्या घोणस आढळला.

A snake like python found in Solapur | सोलापुरात आढळला अजगरासारखा डुरक्या घोणस

सोलापुरात आढळला अजगरासारखा डुरक्या घोणस

googlenewsNext

सोलापूर : उन्हाळा संपला तरी त्याची तीव्रता मात्र हटायला तयार नाही. मानवजातच काय पशुपक्षी, वन्यजीवांना हैराण करून सोडलंय. त्यातच वातावरणातील उष्मा आणि तापलेल्या जमिनीमुळे सापांसारखे सरपटणारे वन्यजीव मानवी वस्तीमध्ये दिसू लागले आहेत. दिसायला अजगरासारख्या रंगाचा डुरक्या घोणस बाळे गावामध्ये लोकवस्तीमध्ये आढळला. शिकार करताना तो भक्ष्याला घट्ट आवळून गुदमरुन टाकतो आणि ते तो खाद्या म्हणून वापर करतो. सर्पमित्रांच्या मदतीनं त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

बाळे परिसरात राहणारे विकास गायकवाड नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना त्यांच्या घरामध्ये हा डुरक्या घोणस आढळला. त्याच्या शरीरावर मोठ्या अजगरासारखे पट्टे आढळले. प्रथमदर्शनी तो विषारी घोणस समजून गायकवाड यांनी सर्पमित्र अनिल अलदर यांना कल्पना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो डुरक्या घोणस बिनविषारी असल्याचे सांगण्यात आले.

दुर्मिळ डुरक्या घोणस हा अजगरासारखा दिसत असल्याने त्याला अजगराचं पिल्लू समजलं जातं. हा साप शिकार करताना आपल्या भक्षाला घट्ट आवळून पीळ मारतो आणि त्याचा जीव गुदमरेपर्यंत त्याला तसेच ठेवतो. तो मेल्यावर त्याला खातो. त्याचे शेपूट कानसाप्रमाणे आणि करवतीप्रमाणे खरखरीत असते. भुसभुशीत जमिनीतील माती अंगावर ओढून त्याच्याखाली तो लपतो. या सापाच्या डोक्याचा आकार विषारी घोणसप्रमाणे असतो. त्याला हाताळल्यास सुरुवातीला हल्ला करतो. त्याचे दात अतिशय तीक्ष्ण असतात.

शेतकऱ्याचा मित्र
हा साप शेतकरीबंधूचा मित्र समजला जातो. याचे कारण या सापाचे खाद्य उंदीर, बेडूक, छोटे सस्तन प्राणी आहे. हे प्राणी शेतातील पिकांची नासधूस करतात त्यांना डुरक्या घोणस आपल्या खाद्यासाठी उपयोग करीत असल्याने शेतकरी त्याला मित्र समजतात.
 

Web Title: A snake like python found in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.