पंढरीत पालखी तळावर झोपलेल्या वारकरीबुवास सापानं मारला डंख
By विलास जळकोटकर | Published: July 16, 2024 05:30 PM2024-07-16T17:30:00+5:302024-07-16T17:31:38+5:30
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुराकडे लाडक्या पांडुरंगाच्या दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत.
विलास जळकोटकर, सोलापूर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपुराकडे लाडक्या पांडुरंगाच्या दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत. मंगळवारी पहाटेच्या दरम्यान वाखरीच्या पालखीतळावर वामकुक्षी घेत असलेल्या वारकरीबुवांना सापानं डंख मारला. त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किसन वाघोजी कांबळे (वय ६०, रा. कंदर, जि. नांदेड) असे त्यांचे नाव आहे.
यातील वारकरी किसन कांबळे हे पंढरपुरात त्यांच्या गावाकडील आप्तस्वीयांसोबत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. पंढरपुरात पोहचण्यापूर्वी ते वाखरी येथे आपल्या गावकऱ्यांसमवेत पालखीसमवेत वामकुक्षी घेत होते. आजूबाजूला पटांगण पावसामुळे गवत उगवलेले होते. पहाटेच्या दरम्यान त्यांच्या उजव्या हाताला सापानं दंश केला.
या प्रकाराची दखल घेऊन त्यांच्या सोबतचा मित्र गोपाळ यांनी त्यांना पंढरपुरातील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करवून घेतले. डॉक्टरांच्या सल्ल्यांने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, ते शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.