भरधाव कारने दिंडीतील सात वारकऱ्यांना चिरडले; कार्तिकी वारीसाठी जाताना अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 06:09 IST2022-11-01T06:08:59+5:302022-11-01T06:09:08+5:30
जठारवाडी येथील माऊली भजनी मंडळाच्या दिंडीत ३२ वारकरी सहभागी झाले आहेत.

भरधाव कारने दिंडीतील सात वारकऱ्यांना चिरडले; कार्तिकी वारीसाठी जाताना अपघात
सांगोला (जि. सोलापूर) : कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या दिंडीत भरधाव कार घुसल्याने सात भाविक जागीच ठार झाले तर पाचजण गंभीर जखमी झाले. हे सर्व वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी (ता. करवीर) येथील आहेत. हा अपघात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सांगोला - मिरज रस्त्यावरील जुनोनी बायपासजवळ घडला. यातील मृतांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि लहान मुलाचा समावेश आहे. मृत आणि जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नव्हती.
जठारवाडी येथील माऊली भजनी मंडळाच्या दिंडीत ३२ वारकरी सहभागी झाले आहेत. भाविक दोन गटांमध्ये चालत होते.पहिल्या टप्प्यातील भाविकांना या कारने ठोकरले. पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी येत जखमी भाविकांना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मृतांना प्रत्येकी पाच लाख-
या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीची मदत देण्याची घोषणा केली आहे.